पर्युषण हे आत्म्याच्या आराधनेचे पर्व ! : आचार्य लोकेश मुनीजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:13 AM2021-09-08T04:13:08+5:302021-09-08T04:13:08+5:30
नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीमध्ये अनेक पर्व मनविले जातात. यात काही लौकिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय पर्वही आहेत. मात्र, पर्वराज ...
नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीमध्ये अनेक पर्व मनविले जातात. यात काही लौकिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय पर्वही आहेत. मात्र, पर्वराज पर्युषण हे आत्मराधनेचे महान आध्यात्मिक पर्व आहे, अशा शब्दांत अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक प्रख्यात जैनाचार्य डॉ. लोकेश मुनी म.सा. यांनी पर्युषण पर्वाची महती विषद केली.
पर्युषण पर्वकाळात ऑनलाइन व्याख्यानमाला सुरू आहे. अध्यात्माने ओतप्रोत भरलेल्या आपल्या व्याख्यानात आचार्यश्री म्हणाले, आपले शरीर म्हणजे निव्वळ हाडामासाचा पुतळा नव्हे, तर यात विश्वाची परमसत्ता (आत्मा) सामावली आहे. आध्यात्मिक अनुष्ठानाने ती जागृत करून आपण स्वत:चे कल्याण करू शकतो. पर्युषण पर्वाचे हे आठही दिवस आपणाला हीच संधी देत असतात. या पर्वकाळात त्याग-तपस्या, ध्यान-स्वाध्याय आदी विविध आध्यात्मिक अनुष्ठानांच्या माध्यमातून आपल्या आत्म्याच्या अधिक जवळ पोहचा, असे आवाहन त्यांनी भक्तजनांना केले.
प्रख्यात मोटिव्हेशनल स्पीकर साजन शाह म्हणाले, महापर्वाच्या काळात पूज्य आचार्य लोकेश मुनीजी म.सा. यांची ऑनलाइन प्रवचन श्रृंखला फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नियमित सुरू आहे. देश-विदेशातील आत्माराधना प्रेमी याचा लाभ ‘अहिंसाविश्वभारती’ या फेसबुक पेजवरून घेत आहेत. ११ सप्टेंबरपर्यंत हे आयोजन चालणार आहे. बुधवारी ८ सप्टेंबरला ‘शांतीचा संदेश : ध्यानयोग’, ९ सप्टेंबरला ‘ज्ञानाचा मार्ग : स्वाध्याय योग’, १० सप्टेंबरला ‘अध्यात्माचे सार : समता योग’ आणि ११ सप्टेंबरला ‘क्षमा : वीरांचे आभूषण’ या व्याख्यानांचा लाभ घेता येणार आहे.