रिझर्वेशन शिवशाहीचे, बसस्थानकावरून सोडली साधी बस; एसटीवाले म्हणाले बसा याच गाडीत
By नरेश डोंगरे | Published: May 27, 2023 03:23 PM2023-05-27T15:23:42+5:302023-05-27T15:30:36+5:30
ऐनवेळी प्रवाशांची तारांबळ
नागपूर : ऑनलाईन बुकींग, डिजिटल पेमेंट अन् एकूणच प्रक्रियेत दूर दूर असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांकडून बुकिंग शिवशाही बसचे करून घेतले. ऐनवेळी मात्र शिवशाही ऐवजी साधी (लालपरी) बस फलाटावर लावून त्याच बसमधून प्रवाशाला गावाला नेण्याचा आग्रह चालविला. नकार देणाऱ्या प्रवाशाला एसटीच्या उर्मट कर्मचाऱ्यांनी प्रचंड मनस्तापही दिला. शनिवारी सकाळी गणेशपेठ बसस्थानकावर हा संतापजनक प्रकार घडला.
स्थानिक निवासी मिर्झा नामक प्रवाशाने कारंजा लाड येथे जाण्यासाठी शिवशाही बसचे ऑनलाईन दोन तिकिटं बूक केले होते. बस शनिवारी सकाळी ९ वाजून काही मिनिटांनी नागपूर स्थानकावरून सुटणार होती. त्यामुळे मिर्झा नमूद वेळेच्या काही मिनिटांपूर्वीच बसस्थानकावर पोहचले. पाहतात तर काय, त्या फलाटावर, कारंजाला जाणारी शिवशाही बस नव्हती. शिवशाही ऐवजी दुसरीच बस होती. संबंधित प्रवाशाने चालक वाहकाकडे विचारणा केली असता कारंजाला आता शिवशाही नाही तर ही साधीच बस जाईल. तुम्ही याच बसमध्ये बसून प्रवास करण्याचा सल्ला चालक, वाहकाने दिला.
मिर्झा यांनी या संबंधाने चाैकशी कक्षात जाऊन दाद मागितली असता तेथील कर्मचाऱ्यांनीसुद्धा शिवशाही जाणार नाही, ही साधीच बस जाईल, तुम्ही त्याचबसमध्ये बसून कारंजाचा प्रवास करा, असा आग्रह धरला. मिर्झा यांनी साध्या बसमधून प्रवास करण्यास नकार देऊन आपले शिवशाहीचे तिकिट रद्द करण्याची मागणी केली. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी मिर्झा यांना फलाटावर लागलेली बस सुटण्यापूर्वी ऑनलाईन तिकिटाचे प्रिंट काढून आणा, अन्यथा बस सुटल्यानंतर तुमचे तिकिट कॅन्सल होणार नाही आणि तुम्हाला एक रुपयाही मिळणार नाही, असे ठणकावून सांगितले. विशेष म्हणजे, एवढ्या सकाळी बसस्थानक परिसरात एकही झेरॉक्स सेंटर सुरू होत नाही. त्यामुळे कशी बशी धावपळ करत दुरवरून मिर्झा यांनी प्रिंट काढून आणले. त्यानंतर एक नव्हे तर तीन प्रिंट हव्या, असे म्हणत पुन्हा परत पाठवले.
९८० चे दिले ९१६
मिर्झा यांनी कर्मचाऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांचे कारंजा येथे जाण्याचे शिवशाही बसचे ९८० रुपयांचे तिकिट कॅन्सल केले आणि रिफंड म्हणून मिर्झा यांच्या हातात केवळ ९१६ रुपये ठेवले. उर्वरित ६४ रुपये टॅक्स कपात करण्यात आल्याचे सांगितले. हा टॅक्स नेमका कशाचा ते मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले नाही.
अधिकाऱ्यांकडून दखल
या संबंधाने गणेशपेरठ आगाराचे व्यवस्थापक गाैतम शेंडे यांना हा प्रकार सांगण्यात आला. त्यांनी असे झाले असेल तर ते योग्य नाही, असे सांगून संबंधित वेळेला कोण अधिकारी, कर्मचारी होते, त्यांची चाैकशी करण्याचे आश्वासन दिले. यापुढे असे प्रकार घडणार नाही, याचीही काळजी घेण्यात येईल, असे शेंडे म्हणाले.