पॅसेंजर सुरू होईना, स्पेशल गाडीही थांबेना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 AM2021-08-24T04:12:49+5:302021-08-24T04:12:49+5:30
सौरभ ढोरे काटोल : कोरोना संसर्गामुळे गत दीड वर्षापासून रेल्वेने पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग ...
सौरभ ढोरे
काटोल : कोरोना संसर्गामुळे गत दीड वर्षापासून रेल्वेने पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने शासनाने सर्वच निर्बंध शिथिल केले आहेत. रेल्वे विभागाने विशेष व काही एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. पण पॅसेंजर आणि लोकल गाड्या अजूनही सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा भुर्दंड बसतो आहे. एक्स्प्रेस गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देत गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र त्यांना पूर्वीप्रमाणे थांबे दिले नाहीत. दुसरीकडे पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासाठी अद्याप कुठलीही पावले रेल्वे व राज्य सरकारने उचललेली नाहीत. त्यामुळे पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू केल्याने कोरोना वाढतो का, असा सवाल वर्षानुवर्षे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी करीत आहेत.
काटोल,नरखेड व कळमेश्वर तिन्ही स्थानकावरून मोठ्या प्रमाणात स्थानिक नोकरदार, विद्यार्थी व व्यावसायिकांसाठी पॅसेंजर गाडी प्रवासासाठी उपयुक्त माध्यम आहे. मात्र पॅसेंजर कधी सुरु होणार हे अद्यापही स्पष्ट नसल्याने इतर साधनांचा प्रवासासाठी उपयोग करावा लागत असल्याने स्थानिक प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे.
बंद असलेल्या पॅसेंजर व थांबा असलेल्या गाड्या
मागील दीड वर्षापासून नागपूर- इटारसी पॅसेंजर,इटारसी-नागपूर पॅसेंजर बंद आहे. आता दक्षिण एक्स्प्रेस कळमेश्वर,काटोल व नरखेडला थांबत नाही. याचा फटका या स्टेशनवरून नागपूरला जाणाऱ्या तसेच नागपूरवरून या इकडे येणाऱ्या प्रवाशांना बसतो आहे.
सर्वच एक्स्प्रेस गाड्या रुळावर परंतु थांबा नाही
रेल्वे विभागाने काही एक्स्प्रेस गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा दिल्यामुळे या गाड्यांचा थांबा तालुकास्तरावर नाही. यामुळे तिकिटाचे दर दुप्पट झाले आहेत. मागील महिन्यापासून सर्वच एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्वच एक्स्प्रेस गाड्या रुळावर आल्याचे चित्र आहे.
--
गत दीड वर्षापासून पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्या बंद असल्याने नागपूर ते काटोल हा प्रवास बसने करावा लागत आहे. दक्षिण एक्स्प्रेसने जरी अपडाऊन केले तरी जास्तीत जास्त ५०० रुपये खर्च होत असे. या गाड्या सुद्धा थांबत नसल्याने वेळ आणि पैशाचा सुध्दा भुर्दंड बसतोय आहे. त्यामुळे रेल्वेने विशेष गाड्यांप्रमाणेच आता एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची गरज आहे.
- कार्तिक गावंडे, प्रवासी
---
रेल्वे विभागाने कोरोनाच्या नावावर विशेष गाड्यांची संख्या वाढविली. मात्र, पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे या गाड्या सुरू केल्यानेच कोरोना होतोय काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
- कपिल राऊत, प्रवासी
230821\1857-img-20210823-wa0152.jpg
काटोल रेल्वे स्थानक फोटो