रेल्वेस्थानक हवे ‘पॅसेंजर फे्रेण्डली’

By admin | Published: October 29, 2015 03:20 AM2015-10-29T03:20:54+5:302015-10-29T03:20:54+5:30

नागपूर देशाच्या हृदयस्थानी आहे. देशाच्या कोणत्याही भागात येथून रेल्वेने जाता येते. नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १०० ते ११० रेल्वेगाड्या ये-जा करतात.

'Passenger Friendly' in Railway Station | रेल्वेस्थानक हवे ‘पॅसेंजर फे्रेण्डली’

रेल्वेस्थानक हवे ‘पॅसेंजर फे्रेण्डली’

Next

‘एस्क्लेटर’ची संख्या अपुरी : तिकीट वितरणात यावी सुसूत्रता
नागपूर देशाच्या हृदयस्थानी आहे. देशाच्या कोणत्याही भागात येथून रेल्वेने जाता येते. नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १०० ते ११० रेल्वेगाड्या ये-जा करतात. यात दररोज ४० ते ५० हजारावर प्रवासी या स्थानकावर ये-जा करतात. नागपूर रेल्वेस्थानकाचा वर्ल्ड क्लास स्थानकाच्या धर्तीवर विकास करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. परंतु केवळ घोषणा करून रेल्वे मंत्रालय मोकळे झाले. प्रत्यक्षात वर्ल्ड क्लास स्थानकासारखा विकास करण्याच्या दृष्टीने कुठलेच प्रयत्न अद्याप झालेले नाहीत. सध्या तर अतिशय छोट्या सुविधाही रेल्वेस्थानकावर उपलब्ध नसल्याचे चित्र दृष्टीस पडते. शहरातील नागपूर, अजनी, इतवारी या स्थानकांवर हेच चित्र पाहावयास मिळते. दरवर्षी जवळपास २७०० कोटी रुपयांचे उत्पन्न पदरात पडूनही रेल्वेस्थानकांवर हवा त्या गतीने विकास होताना दिसत नाही.(प्रतिनिधी)

नागपूर : उपराजधानीतील मुख्य रेल्वे स्थानकासोबतच अजनी व इतवारी येथील रेल्वेस्थानकांवर एक दृष्टिक्षेप टाकला असता हे रेल्वेस्थानक स्मार्ट सिटीच्या दृष्टीने सपशेल ‘फेल’ ठरत असल्याचे जाणवते. प्रवाशांच्या दृष्टिकोनातून अजूनही या रेल्वेस्थानकांना मैलाचा दगड गाठायचा आहे. दरवर्षी जवळपास २७०० कोटी रुपयांचा महसूल मिळूनही या रेल्वेस्थानकांचा विकास कासवगतीने सुरू आहे. शहरात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर शहराची छाप सोडण्यात रेल्वे स्थानकाचा लूक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे जोवर येथील रेल्वेस्थानकांचा दर्जा सुधारणार नाही, प्रवाशांना आवश्यक असलेल्या सोयी उपलब्ध होणार नाही, रेल्वेस्थानक खऱ्या अर्थाने ‘पॅसेंजर फे्रेण्डली’ होणार नाही तोवर स्मार्ट सिटीची संकल्पना मूर्तरूप घेणार नाही.

‘नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील भागातून पोहोचणे प्रवाशांसाठी तारेवरची कसरत ठरते. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे बराच वेळ लागतो. त्यामुळे रेल्वेस्थानकावर पोहोचणारे मार्ग वाढविण्याची गरज आहे. याशिवाय प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एस्क्लेटर, मेडिकल शॉप असणे गरजेचे आहे. रेल्वेस्थानकावर ‘मल्टीप्लेक्स पार्किंग’ची सुविधा महत्त्वाची आहे. अनेक प्लॅटफॉर्मवर शेड नसल्यामुळे प्रवाशांवर भिजण्याची पाळी येते. त्यामुळे या ठिकाणी शेडची व्यवस्था करणे गरजेचे आहे.’
-प्रवीण डबली,
सदस्य, प्रादेशिक रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती

वायफायची सुविधा हवी
अनेकदा रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात. अशा स्थितीत प्रवाशांना आपला वेळ कसा घालवावा, असा प्रश्न पडतो. त्यामुळे रेल्वेस्थानकावर वायफायची सुविधा उपलब्ध असल्यास प्रवाशांसाठी ती मोठी पर्वणी ठरेल. परंतु अर्थसंकल्पात घोषणा होऊनही अद्याप रेल्वे मंत्रालयाने नागपूर-इतवारी रेल्वेस्थानकावर ही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.
प्रत्येक प्लॅटफार्मवर हवेत ‘एस्क्लेटर’
ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्णांना त्यांच्या कोचपर्यंत पोहोचविण्यासाठी सध्या नागपूर रेल्वेस्थानकावर दोन बॅटरी कार उपलब्ध आहेत. परंतु या बॅटरी कार नेहमीच तांत्रिक बिघाडामुळे बंद राहतात. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक, रुग्णांसाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ‘एस्क्लेटर’ची आणि बॅटरी कारची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला. परंतु पुढे या प्रस्तावाचे काहीच होऊ शकले नाही.
शॉपिंग मॉल व हॉटेलची गरज
अनेकदा काही मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे रेल्वेगाड्यांना ८ ते १० तासांचा विलंब होतो. अशा परिस्थितीत रेल्वेस्थानकावर शॉपिंग मॉलची सुविधा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांना या वेळेचा सदुपयोग करून गरजेच्या वस्तू खरेदी करता येतील. सोबतच शहरातील औद्योगिक विकासाला चालना मिळाल्यानंतर शहरात येणारा व्यापारी वर्ग, व्यावसायिक यांची गरज लक्षात घेता रेल्वेस्थानकावर दर्जेदार भोजन व निवास व्यवस्था उपलब्ध करून देणारे हॉटेल उभारण्याचीही गरज आहे.
अजनी, इतवारीचा टर्मिनलच्या
रूपाने विकास
अजनी आणि इतवारी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची बऱ्यापैकी वर्दळ असते. परंतु अनेक रेल्वेगाड्या या ठिकाणी थांबा नसल्यामुळे थांबत नाहीत. त्यामुळे या रेल्वेस्थानकांवर दोन मिनिटांचा थांबा दिल्यास नागपूर रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गर्दी आटोक्यात आणण्यात यश येऊ शकते. याशिवाय इतवारी, अजनीचा टर्मिनलच्या रूपाने विकास करून तेथे सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यास ते प्रवाशांच्या सोयीचे ठरणार आहे.
यात्री निवासाची गरज
रेल्वेस्थानकावर गरीब प्रवाशांसाठी यात्री निवास उपलब्ध करून देण्याची गरज आहे. गरीब प्रवाशांना महागडे हॉटेल व लॉजमध्ये राहणे परवडत नाही. त्यामुळे ते चालू तिकीट कार्यालय, पॅसेंजर लाऊंज, प्लॅटफार्म तसेच रेल्वेस्थानकावर जागा मिळेल तेथे झोपतात. पश्चिमेकडील भागात सर्वत्र प्रवासी झोपलेले असल्याचे चित्र रात्री पहायला मिळते. स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या नागपूरसाठी हे चित्र भूषणावह असणार नाही. त्यामुळे या प्रवाशांसाठी स्वस्त दरात यात्री निवास उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
सर्वच प्लॅटफॉर्मवर हव्यात सुविधा
नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक १ वर बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध आहेत. परंतु इतर प्लॅटफॉर्मवर मात्र या सुविधांचा अभाव असल्याचे जाणवते. त्यामुळे प्रवाशांना लागणाऱ्या सर्व बाबींची खातरजमा करून या प्लॅटफॉर्मवर खाण्याचे स्टॉल्स, फार्मसी, स्वच्छता राखण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने करण्याची गरज आहे. प्लॅटफॉर्म १ प्रमाणे इतर प्लॅटफॉर्मवरही सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
मल्टिप्लेक्स पार्किंग हवे
मुख्य रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेच्या भागात उत्तरेकडे दुचाकी पार्किंगची सुविधा आहे. मात्र, ही सुविधा पुरेशी नाही. पश्चिमेकडेच समोरच्या भागात चारचाकी पार्किंग केली जाते. सण, उत्सवाच्या काळात तर रेल्वेस्थानकावर पार्किंगसाठीही जागा मिळत नाही. येत्या काळात रेल्वेस्थानकावर येणाऱ्या वाहनांची संख्या वाढेल. तेव्हा पार्किंगचा प्रश्न आणखीनच तीव्र होईल. त्यामुळे उपलब्ध जागेवर मल्टिप्लेक्स पार्किंगची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

Web Title: 'Passenger Friendly' in Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.