भोजन महागात विकल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:31 AM2019-04-02T00:31:49+5:302019-04-02T00:32:42+5:30
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये तिप्पट दराने भोजनाची विक्री केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी सोमवारी रात्री ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर रोखून गोंधळ घातला. दरम्यान, ‘डीआरएम’ला बोलविण्याची मागणी करून त्यांनी गीतांजली एक्स्प्रेसमध्ये ११ वेळा चेनपुलिंग करून गाडी थांबविली. यामुळे या गाडीतील इतर प्रवाशांनाही त्रास होऊन ते आपसात भांडत होते. या तणावाच्या परिस्थितीत अखेर उपस्टेशन व्यवस्थापकांकडे तक्रार दाखल केल्यानंतर एका तासाने ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गीतांजली एक्स्प्रेसमध्ये तिप्पट दराने भोजनाची विक्री केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी सोमवारी रात्री ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर रोखून गोंधळ घातला. दरम्यान, ‘डीआरएम’ला बोलविण्याची मागणी करून त्यांनी गीतांजली एक्स्प्रेसमध्ये ११ वेळा चेनपुलिंग करून गाडी थांबविली. यामुळे या गाडीतील इतर प्रवाशांनाही त्रास होऊन ते आपसात भांडत होते. या तणावाच्या परिस्थितीत अखेर उपस्टेशन व्यवस्थापकांकडे तक्रार दाखल केल्यानंतर एका तासाने ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसच्या पेंट्रीकारमधून भोजन तिप्पट दराने विकण्यात आल्यामुळे एसी कोचमधील एक महिला प्रवासी गायत्री नायर यांनी यास विरोध दर्शविला. परंतु व्हेंडर आपल्या जागी अडून बसला. नायर यांनी व्हेंडरला रेल्वे बोर्डाने ठरवून दिलेल्या खाद्यपदार्थांचा चार्ट दाखविल्यानंतरही तो आपल्या किमतीवर अडून होता. प्रकरण वाढत असल्याचे पाहून व्हेंडरने योग्य दराने भोजन देण्याचे मान्य केले. यामुळे नायर यांनी व्हेंडरला खडेबोल सुनावले. या कोचमधील दुसरी महिला प्रीती दास यांनीही पेंट्रीकार मॅनेजरला सुनावले. ही गाडी रात्री ९.१० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर आली. यावेळी अनेक प्रवाशांनी ‘डीआरएम’ला बोलविण्याची मागणी रेटून धरली. ए १ आणि बी १ कोचच्या प्रवाशांनी पेंट्रीकार मॅनेजरने अधिक दराने भोजन दिल्याबाबत माहिती नसल्याचे सांगितल्यावर प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ जवान आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. परंतु प्रवासी आपल्या मागणीवर अडून होते. प्रवाशांनी ११ वेळा चेनपुलिंग करून गाडी रोखून धरली. अखेर प्रवाशांची समजूत घातल्यानंतर ही गाडी रात्री १०.१३ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.