बॅग सॅनिटायझर मशीनवर प्रवाशांची लुट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:47+5:302021-07-11T04:07:47+5:30
नागपूर : सॅनिटाईज मशीनमध्ये बॅग सॅनिटाईज करणे ऐच्छिक आहे. परंतु नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात मात्र प्रवाशांना जबरदस्तीने मशीनमध्ये बॅग ...
नागपूर : सॅनिटाईज मशीनमध्ये बॅग सॅनिटाईज करणे ऐच्छिक आहे. परंतु नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात मात्र प्रवाशांना जबरदस्तीने मशीनमध्ये बॅग टाकायला लावून त्यांच्याकडून १० रुपये शुल्क वसूल करण्यात येत आहे. बॅग सॅनिटाईज करणे मोफत सेवा असल्याचे समजून प्रवासी बॅग मशीनमध्ये टाकतात. परंतु नंतर त्यांना त्याचे पैसे लागत असल्याचे समजल्यानंतर त्यांचा मशीनवरील कामगारांसोबत वाद होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षेसाठी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात बॅग सॅनिटायझर मशीन लावण्यात आली. त्यासाठी रेल्वेने एका खासगी कंपनीसोबत करार केला. करारानुसार प्रवाशांनी बॅग सॅनिटाईज केल्यास त्यांच्याकडून १० रुपये शुल्क आकारायला हवे. ही सेवा घेणे ऐच्छिक आहे. परंतु गाडी सुटेल या भीतीने घाईगडबडीत प्रवासी तेथील सूचनेकडे लक्ष देत नाहीत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॅग स्कॅनर मशीन लावलेली आहे. या मशीनमध्ये बॅग टाकल्यानंतर कोणतेच शुल्क आकारल्या जात नाहीत हे प्रवाशांना माहीत आहे. परंतु बॅग सॅनिटायझर मशीनमध्ये बॅग टाकल्यानंतर त्याचे शुल्क द्यावे लागते हे प्रवाशांना माहीत नाही. मुख्य प्रवेशद्वारावर बॅग सॅनिटाईझ मशीनवर काम करणारा एक कामगार आणि दोन महिला उपस्थित असतात. प्रवासी जवळ येताच ते बॅग सॅनिटाईज करण्यासाठी मशीनमध्ये टाकावयास सांगतात. त्यामुळे प्रवासी बॅग मशीनमध्ये टाकतात. परंतु बॅग सॅनिटाईझ झाल्यानंतर त्यांना पैशांची मागणी करण्यात येते. त्यामुळे मशीनवरील कामगार आणि प्रवाशांमध्ये वाद होत आहेत. शनिवारी सकाळी रेल्वेच्या क्षेत्रीय उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य सतीश यादव हे राजधानी एक्स्प्रेसने बंगळुरला जात होते. त्यांनाही मुख्य प्रवेशद्वारावर बॅग मशीनमध्ये टाकण्यास सांगण्यात आले. त्यांनी बॅग टाकल्यानंतर त्यांना दोन बॅगचे २० रुपये मागण्यात आले. ही सेवा ऐच्छिक असताना बॅग टाकण्याची जबरदस्ती कशाला करता अशी विचारणा केल्यानंतर मशीनवरील कामगाराने त्यांच्याशी वाद घातला. त्यामुळे रेल्वेस्थानकावर होत असलेली प्रवाशांची लूट थांबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
................