‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:13 AM2020-11-28T04:13:46+5:302020-11-28T04:13:46+5:30
एकाच चाचणीसाठी वेगवेगळे शुल्क नागपूर : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दिल्ली, अहमदाबाद, राजस्थान आणि गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी ...
एकाच चाचणीसाठी वेगवेगळे शुल्क
नागपूर : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दिल्ली, अहमदाबाद, राजस्थान आणि गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. ही सुविधा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु एकाच चाचणीसाठी प्रवाशांकडून वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या राज्यातून महाराष्ट्रात यायचे असल्यास कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अमंलबजावणी सुरू झाली आहे. याबाबत राज्य सरकारने नियम जारी केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. जे प्रवासी ही चाचणी न करता येत आहेत, त्यांच्यासाठी विमानतळावर एका खासगी पॅथॉलॉजी लॅबतर्फे बूथ सुरू करण्यात आले आहे. या बूथवर चाचणी करणाऱ्या प्रवाशांकडून एकाच प्रकारच्या चाचणीसाठी १२००, १४००, १६००, १८०० असे शुल्क आकारण्यात येत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे विमानतळावर प्रवाशांची लूट सुरू आहे.
...............