नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे बसने आगारातच प्रवाशाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:22 PM2018-01-24T12:22:38+5:302018-01-24T12:22:58+5:30
एसटी महामंडळाच्या काटोल आगारात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशाला बसनेच चिरडले. हा अपघात मंगळवारी (दि. २३) दुपारी १ वाजताच्या सुमारास काटोल आगारात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
काटोल : एसटी महामंडळाच्या काटोल आगारात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशाला बसनेच चिरडले. हा अपघात मंगळवारी (दि. २३) दुपारी १ वाजताच्या सुमारास काटोल आगारात घडला. या घटनेमुळे काही काळ काटोल आगारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेमंतकुमार मंगल निकोसे (५८, रा. नागपूर) असे मृताचे नाव आहे. ते काटोल तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. बाहेरगावी जाण्यासाठी ते मंगळवारी दुपारच्या सुमारास काटोल आगारात आले होते. तेथे बसची प्रतीक्षा करीत ते उभे होते. दरम्यान दुपारी १ वाजताच्या सुमारास एमएच-४०/वाय-५९३८ क्रमांकाची परतवाडा-नागपूर बस आली.
त्या बसचा चालक बस फलाटावर लावण्यासाठी रिव्हर्स घेत असताना हेमंतकुमार यांना धक्का बसल्याने ते खाली पडले. त्यातच ते बसच्या मागील चाकात सापडले. बसचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने रक्तबंबाळ होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी बसचालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास काटोल पोलीस करीत आहे.