प्रवाशांच्या भोजनाचेही होतेय खासगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:11 AM2017-09-05T00:11:32+5:302017-09-05T00:12:24+5:30
टप्प्याटप्प्याने रेल्वेच्या सर्व विभागात आऊटसोर्सिंग सुरू असताना, ...
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टप्प्याटप्प्याने रेल्वेच्या सर्व विभागात आऊटसोर्सिंग सुरू असताना, आता रेल्वे बोर्डाने प्रवाशांना दर्जेदार भोजन पुरवीत असलेल्या बेस किचनचा ताबाही ‘आयआरसीटीसी’कडे (इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन) देण्याचा घाट घातला आहे. त्याबाबतचा आदेश नुकताच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात धडकला आहे. रेल्वेगाड्यात खासगी कंत्राटदारांकडून भोजन पुरवठा करताना प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी असताना, रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर आणि बल्लारशा येथे असे दोन बेस किचन आहेत तर मध्य रेल्वेत जवळपास १२ बेस किचन आहेत. बेस किचनमध्ये रेल्वेचे कर्मचारी भोजन, नाश्ता तयार करून ते रेल्वेगाड्यात पुरविण्याचे काम करतात. बेस किचनमध्ये रेल्वे बोर्डाने यापूर्वीच स्वयंपाक बनविण्याचे अत्याधुनिक यंत्र उपलब्ध करून दिले आहे.
बेस किचनमधील कारभार सुरळीत सुरू असताना, अचानक रेल्वे बोर्डाने बेस किचन ‘आयआरसीटीसी’ला सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. २५ वर्षांच्या लीजवर रेल्वे बोर्डाकडून हे बेस किचन ‘आयआरसीटीसी’ला देण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश मध्य रेल्वेच्या अखत्यारितील सर्व विभागांना पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे काही दिवसात किचनवर आयआरसीटीसीचा ताबा दिसणार आहे.
प्रवाशांच्या वाढणार तक्रारी
‘आयआरसीटीसी’कडे बेस किचनचा ताबा दिल्यानंतर आयआरसीटीसी रेल्वेगाड्यात भोजन पुरविण्याचे कंत्राट खासगी कंत्राटदारांना देणार आहे. अनेकदा खासगी कंत्राटदारांकडून पेन्ट्रीकारमध्ये पुरविल्या जाणाºया भोजनाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे प्रवासी गोंधळ घालून रेल्वेगाडीत चेन पुलिंग करतात, असा अनुभव आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच अशा घटना होत असतात. कंत्राटदाराने पेन्ट्रीकारमध्ये ठेवलेले कामगार खासगी राहणार असल्यामुळे आणि रेल्वेशी त्यांचा संबंध नसल्यामुळे भविष्यात प्रवाशांच्या भोजनाबाबतच्या तक्रारी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बेस किचन सोपविण्यास आम्ही तयार
‘रेल्वे बोर्डाकडून बेस किचन आयआरसीटीसी’ला सोपविण्याचा आदेश आला आहे. आयआरसीटीसीच्या अधिकाºयांनीही तीनवेळा भेट दिली, परंतु कधी ताबा द्यायचा याचा कालावधी ठरला नाही. ‘आयआरसीटीसी’ने मागितले तेव्हा बेस किचन देण्यास आम्ही तयार आहोत.’
-कुश किशोर मिश्रा, सिनिअर डीसीएम, मध्य रेल्वे नागपूर विभाग
पेंट्रीकारमधून प्रवाशांना मिळावी पावती
‘आजपर्यंत पेंट्रीकारमधून प्रवाशांना खरेदी केलेल्या भोजनाची पावती मिळत नव्हती. त्यामुळे भोजन निकृष्ट असल्यास प्रवाशांना ग्राहक मंचात जाण्यासाठी कुठलाही पुरावा उपलब्ध राहत नव्हता. आता रेल्वेने आयआरसीटीसीकडे बेस किचनचा ताबा दिल्यानंतर प्रवाशांना भोजनासाठी आकारलेल्या दराबाबतची पावती मिळणे गरजेचे आहे. याशिवाय प्रवाशांना दर्जेदार भोजन मिळावे.’
-बसंतकुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र