प्रवाशांची गर्दीच गर्दी, एमपी, यूपीकडच्या गाड्यात कोटा वाढवा
By नरेश डोंगरे | Published: March 21, 2024 09:59 PM2024-03-21T21:59:15+5:302024-03-21T21:59:33+5:30
नागपूर, विदर्भात बांधकामाच्या कामावर असणाऱ्या एमपी, छत्तीसगड, यूपी आणि बिहारमधील कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे रंगोत्सवानिमित्त गावाला जाण्यासाठी सज्ज असल्याचे रेल्वेस्थानकांवर दिसून येते.
नागपूर: मुंबई, पुणेच नव्हे तर बहुतांश राज्यांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने प्रवाशांना जागा मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त कोच लावावेत आणि कोटा वाढवावा, अशी मागणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली जात आहे.
विविध राज्यांत होळी-धुळवडीचा सण वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा करण्याची परंपरा आहे. कुठे रंगाचा काला करून त्यात मित्रमंडळींना नखशिखान्त ओले करण्याचा, तर कुठे दंड्यांनी बदडून काढण्याची (लठमार) पद्धत आहे. कुठे गोड गाठी खाऊ घालून, तर कुठे भांग अन् चणा-चिवडा खाऊ घालून नाचत, गात रंगोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासली जाते. आपल्या गाव, शहरात साजरा होणाऱ्या उत्साहाने ओतप्रोत असणाऱ्या रंगोत्सवात सहभागी होण्यासाठी अनेकांनी आपापल्या गाव, शहरांकडे धाव घेतली आहे.
नागपूर, विदर्भात बांधकामाच्या कामावर असणाऱ्या एमपी, छत्तीसगड, यूपी आणि बिहारमधील कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे रंगोत्सवानिमित्त गावाला जाण्यासाठी सज्ज असल्याचे रेल्वेस्थानकांवर दिसून येते. या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे विविध मार्गांवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना जागा मिळेनाशी झाली आहे. रंगोत्सव जवळ येत असल्याने ही गर्दी पुढच्या एक-दोन दिवसांत अधिकच वाढणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणेच नव्हे तर एमपी, यूपी, छत्तीसगडकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये अतिरिक्त कोच लावावेत आणि नागपूरहून प्रवासी आरक्षणाचा कोटा वाढवावा, अशी मागणी प्रवाशांसोबतच प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, विभागीय व्यवस्थापकांकडे काहींनी मागणी नोंदवली आहे.
होळी स्पेशल ट्रेन सुरू, मात्र...!
होळी सणाच्या निमित्ताने सर्वच मार्गांवर रेल्वे प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढत असल्याचे ध्यानात घेऊन रेल्वे बोर्डाने देशभरात ५४० होळी स्पेशल ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली. त्यांतील ८८ रेल्वेगाड्या मध्य रेल्वेकडून, तर १९ रेल्वेगाड्या दक्षिण-पूर्व, मध्य रेल्वेकडून चालविल्या जाणार आहेत. यांतील बहुतांश गाड्या धावायला सुरुवातही झाली आहे. मात्र, प्रवाशांची गर्दी बघता, आणखी काही गाड्या सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.