प्रवाशांचे दिवाळे, ट्रॅव्हल्स कंपन्यांची दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:36 AM2017-10-17T00:36:38+5:302017-10-17T00:37:09+5:30
दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या गावाकडे परततात. त्यामुळे या काळात प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या गावाकडे परततात. त्यामुळे या काळात प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होते. त्यामुळेच प्रवाशांच्या या गर्दीचा फायदा घेऊन ट्रॅव्हल्स संचालकांनी आपले दर वाढविले आहेत. स्वत:ची दिवाळी साजरी करीत ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवाशांचेच दिवाळे काढण्यास सुरूवात केली आहे. नेहमी प्रवाशांना दिवाळीच्या काळात भाडे न वाढविता आहे त्याच प्रवासभाड्यात पोहोचविणाºया एसटी महामंडळानेही हाच कित्ता गिरवत भाडेवाढ केली आहे.
दिवाळीच्या काळात अचानक प्रवाशांच्या संख्येत वाढ होते. या काळात नागपुरातून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्या फुल्ल झाल्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्स आणि एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करण्याची पाळी येते. दिवाळीच्या काळातील ही स्थिती पाहून खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक दरवर्षी आपल्या तिकीट दरात भरमसाट वाढ करतात. काहीच इलाज नसल्यामुळे प्रवाशांना अव्वाच्यासव्वा दराचे तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो. पूर्वी एसटी महामंडळ वर्षभर जे तिकीट आकारते त्याच दरात दिवाळीच्या काळात तिकीट आकारत होते. परंतु २०१७ यावर्षी एसटी महामंडळानेही आपल्या तिकीट दरात ५ ते २० टक्के दरवाढ केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. दिवाळी संपेपर्यंत ही दरवाढ अशीच कायम राहणार असून, त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.
शासनाने ट्रॅव्हल्सचे दर ठरवावेत
‘२०१२ मध्ये उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने महाराष्ट्र शासनाला ट्रॅव्हल्सचे दर ठरवून देण्याचा आदेश दिला होता. परंतु शासनाने ट्रॅव्हल्सचे दर ठरविलेले नाहीत. खासगी ट्रॅव्हल्सला होणारे नुकसान दिवाळीच्या काळात भरून काढण्यासाठी ट्रॅव्हल्सच्या संचालकांना दरवाढ करावी लागते.’
-अॅड. महेंद्र लुले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बस, टँकर वाहतूक संघ
असे वाढले आहे प्रवासभाडे
पूर्वी सध्या
पुणे ८०० १६०० ते २२००
औरंगाबाद ८०० १२००
कोल्हापूर १२०० १६०० ते २५००
सोलापूर ९०० १२००
नाशिक १००० १२००
शिर्डी १००० १२००
हैदराबाद ८०० १५०० ते २०००
इंदोर ८०० ११०० ते १६००