शारजावरून येणारे प्रवासी होणार क्वारंटाईन : मनपाचे आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 08:47 PM2021-02-12T20:47:06+5:302021-02-12T20:50:00+5:30
NMC orders, Sharjah Passengers, Nagpur news गेल्या काही दिवसांतील शहरातील कोविड-१९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नागपूर महापालिकेने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नागपुरात शारजाहून येणाऱ्या विमानातील प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) पाठविण्यात येणार असल्याचे आदेश मनपातर्फे जारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसांतील शहरातील कोविड-१९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नागपूर महापालिकेने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नागपुरात शारजाहून येणाऱ्या विमानातील प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) पाठविण्यात येणार असल्याचे आदेश मनपातर्फे जारी करण्यात आले.
आदेशात नमूद केल्यानुसार, शारजा-नागपूर-शारजा हे आंतरराष्ट्रीय विमान १४ फेब्रुवारी, २१ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी रोजी नागपूर विमानतळावर येणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थात मिहान इंडिया लि. यांच्याकडून प्राप्त झाली आहे. या माहितीच्या अनुषंगाने पहिले विमान १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.४५ वाजता नागपूर विमानतळावर येणार असून, त्यांच्यावर संनियंत्रण ठेवण्याकिरता मनपातर्फे उपअभियंता आनंद मोखाडे, कनिष्ठ अभियंता दीपक मेश्राम, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संजय बिसेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांचे या संपूर्ण कार्यवाहीवर नियंत्रण असेल. याशिवाय गृह विलगीकरण आणि कोविडसंदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक राहील, असे आयुक्त राधाकृष्णन बी. तसेच नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
अशी होईल प्रक्रिया
- विमानातून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यासाठी मनपातर्फे विमानतळावर पाच बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
- विमानातून उतरलेल्या प्रवाशांना मनपाच्या बसेसच्या माध्यमातून हॉटेलमध्ये पाठविण्यात येईल.
- सर्व प्रवाशांशी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येईल. त्यांना एसओपीची माहिती देण्यात येईल.
- या सर्व प्रवाशांची पाचव्यादिवशी कोविड चाचणी करण्यात येईल. ज्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह येईल, त्यांना सातव्यादिवशी हॉटेल सोडण्याची परवानगी देण्यात येईल.
यांना मिळेल सूट
विमान प्रवासातील पाच प्रकारातील नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणातून अपवादात्मक परिस्थितीत सूट देण्यात येणार आहे. परंतु यासाठी त्यांना आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागतील.
- ज्यांना आधाराची गरज आहे, असे ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक.
- गर्भवती महिला, पाच वर्षाखालील मुले असलेले पालक.
- कर्करोग, दिव्यांग, मानसिक आजार असलेले रुग्ण, सेलेब्रल पल्सी यासारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या आणि ज्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे, अशा व्यक्ती.
- ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती मृत्यूशय्येवर आहे, अथवा गंभीर अपघाताने दुखापत झाली आहे, कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला आहे, अशा सर्व व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्यात आली आहे.