पुण्याच्या प्रवाशांसाठी मुंबईच्या प्रवाशांना विमानातून उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 02:20 PM2023-05-16T14:20:33+5:302023-05-16T14:20:57+5:30
इंडिगो विमानाला पक्ष्याची धडक अन् आकस्मिक लँडिंग
नागपूर : इंडिगो एअर लाइन्सच्या नागपुरातून पुण्याला जाणाऱ्या विमानाला पक्ष्याने धडक दिल्यामुळे ते विमानतळावर दुपारी १ वाजता आकस्मिक उतरविण्यात आले. विमान तातडीने माघारी फिरल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, प्रवाशांना इच्छितस्थळी पाठवण्यावरून सावळा-गोंधळ झाल्याने पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
पक्षी धडकलेल्या नागपूर-पुणे विमानातील प्रवाशांना इंडिगोने दुसऱ्या विमानाने दुपारी पुण्याला रवाना केले. त्याकरिता कंपनीने नागपुरातून मुंबईला दुपारी ४ वाजता जाणाऱ्या विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरविले आणि दुपारच्या पुण्याच्या विमानातील प्रवाशांना घेऊन ते पुण्याकडे रवाना केले. या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
असे झाले ‘रिजेक्ट टेक ऑफ’
- सोमवारी दुपारी इंडिगोचे नागपूर-पुणे विमान पक्ष्याने धडक दिल्याने ‘रिजेक्ट टेक ऑफ’मध्ये सामील झाले.
- हे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे आहे. विमानाच्या इंजिनात बिघाड झाला आहे. हा बिघाड आधीचाच असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच ते पुणे येथून नागपुरात उशिरा पोहोचले होते.
प्रवासी या विमानातून त्या विमानात
दुपारी १ वाजता पुण्याकरिता झेपावलेल्या इंडिगोच्या विमानाचे आकस्मिक लँडिंग झाल्यानंतर प्रवाशांनी गोंधळ घातला.
त्यानंतर कंपनीने मुंबईला ४ वाजता जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्याच विमानातील प्रवाशांना खाली उतरविले आणि त्यांच्या जागेवर आकस्मिक लँडिंग केलेल्या विमानातील प्रवाशांना बसविले. या विमानाने दुपारी ४ वाजता पुण्याकरिता उड्डाण भरले.
यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्यांनीही गोंधळ घातला. इंडिगोने नंतर या प्रवाशांना सायंकाळी ६ च्या विमानाने मुंबईला रवाना केले.