प्रवाशांमध्ये नागपूर-गोवा रेल्वे गाडीची ‘क्रेझ’
By admin | Published: February 9, 2017 02:41 AM2017-02-09T02:41:39+5:302017-02-09T02:41:39+5:30
महाशिवरात्रीनिमित्त रेल्वे प्रशासनाने गोव्याच्या मडगाव आणि नागपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याची घोषणा केली होती.
उत्स्फूर्त प्रतिसाद : पहिल्या सात दिवसात ८० टक्के बर्थ फुल्ल
नागपूर : महाशिवरात्रीनिमित्त रेल्वे प्रशासनाने गोव्याच्या मडगाव आणि नागपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याची घोषणा केली होती. घोषणा केल्यानंतर या गाडीचे आरक्षण सुरू झाल्यानंतर सातच दिवसात प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ही गाडी ८० टक्के बुक झाली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२०२१ नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी शनिवारी २५ फेब्रुवारीला नागपूरवरून सकाळी ७.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रविवारी २६ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता मडगावला पोहोचणार आहे. या विशेष रेल्वेगाडीची घोषणा केल्यानंतर सातच दिवसात या गाडीतील ८० टक्के बर्थचे आरक्षण झाले आहे. यात स्लिपर क्लासमध्ये २८८ बैकी ८८ बर्थ शिल्लक आहेत. तर थर्ड एसीत ५७६ बर्थपैकी केवळ ३०० बर्थ शिल्लक आहेत. सेकंड एसीतही केवळ २२ बर्थ उरले आहेत तर सेकंड सिटींगमध्येही अतिशय कमी बर्थ उरले आहेत.
२६ जानेवारीलाही ही गाडी सोडण्यात आली होती. तेंव्हासुद्धा प्रवाशांनी या गाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम या मार्गाने मडगावला जाणार आहे.(प्रतिनिधी)
नियमित सुरू करण्याची मागणी
नागपूर-गोवा या रेल्वेगाडीला २६ जानेवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुन्हा प्रायोगिक तत्त्वावर २५ फेब्रुवारीला ही गाडी सोडण्याची घोषणा केली आहे. या गाडीलाही सात दिवसात प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही गाडी नियमित करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.