अंडा बिर्याणीतून प्रवाशांना विषबाधा, ६० ते ७० प्रवासी अस्वस्थ

By नरेश डोंगरे | Published: April 28, 2024 04:43 PM2024-04-28T16:43:00+5:302024-04-28T16:43:22+5:30

रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत.

Passengers poisoned by egg biryani, 60 to 70 passengers unwell | अंडा बिर्याणीतून प्रवाशांना विषबाधा, ६० ते ७० प्रवासी अस्वस्थ

प्रातिनिधिक फोटो

नागपूर : रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत. शुक्रवारी घडलेल्या या घटनेची माहिती पुढे आल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाला प्रचंड हादरा बसला आहे.

संबंधित सूत्राच्या माहितीनुसार, यशवंतपुर एक्सप्रेस शुक्रवारी सकाळी गोरखपूरकडे जात असताना बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून जन आहार स्टॉल मधून अंडा बिर्याणीचे शंभर पार्सल मागविन्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकावरच्या स्टॉल वर त्यातील काही उतरविण्यात आले होते. मागणीप्रमाणे बल्लारशाह, नागपूर, इटारसी आणि पुढे अंडा बिर्याणी वेगवेगळ्या प्रवाशांना देण्यात आली. न इटारसी जवळ ही गाडी पोहोचल्यानंतर अंडा बिर्याणी खाणाऱ्या प्रवाशांना पोटदुखी, मळमळ ओकाऱ्याचा त्रास सुरू झाला.

प्रवासी वेगवेगळ्या आसनावर, वेगवेगळ्या डब्यात असल्याने प्रारंभी या घटनेचे गांभीर्य कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र, इटारसी स्टेशन सोडल्यानंतर विविध डब्यातून एक सारखा त्रास होऊ लागल्याने प्रवासी अस्वस्थ झाले. ही माहिती रेल्वे प्रशासनाला कळताच कानपूर रेल्वे स्थानकावर डॉक्टरांचे पथक गाडीत चढले आणि प्रवाशांचा उपचार सुरू झाला. काही प्रवाशांना फूड पॉईजनचे गंभीर लक्षण दिसू लागल्याने त्यांना वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अंडा बिर्याणी खाल्ल्यानंतर प्रवाशांना विषबाधा झाल्याचे लक्षात येताच संबंधित अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या सर्व वरिष्ठांना कळविले.

नागपूरच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी अंडा बिर्याणीचे पार्सल नेमके कुठून आले आणि प्रवाशांना कुठून देणे सुरू झाले त्याची चौकशी सुरू केली.. त्यानंतर १०० ते २०० प्लेट अंडा बिर्याणी पार्सलचा पुरवठा बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून झाल्याचे आणि नागपूर रेल्वे स्थानकावरूनही जन आहार स्टॉल वरून बरेचसे पाकीट रेल्वे गाड्यात चढविण्यात आल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले. त्यामुळे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित पार्सल विकणाऱ्या येथील जन आहार चा स्टॉल सिल केला.

सॅम्पल जप्त, तपासणीसाठी लॅबमध्ये 

या घटनेची मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून नागपूर तसेच बल्लारशाह या दोन्ही केंद्रावरील विविध खाद्यपदार्थाचे सॅम्पल जप्त करण्यात आले. ते लॅब मध्ये टेस्टिंगसाठी पाठविण्यात आले असून मंगळवारपर्यंत त्याचा अहवाल मिळणार आहे. त्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरविण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी लोकमाशी बोलताना दिली.
 

Web Title: Passengers poisoned by egg biryani, 60 to 70 passengers unwell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.