नागपुरात संपामुळे प्रवाशांचा खासगी बसने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 10:43 PM2018-06-09T22:43:25+5:302018-06-09T22:43:38+5:30
एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचा खोळंबा होऊन प्रवाशांना खासगी बसेसने प्रवास करण्याची पाळी आली. दरम्यान एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ८५ टक्के फेऱ्या रद्द होऊन ४० लाखाचा फटका बसल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचा खोळंबा होऊन प्रवाशांना खासगी बसेसने प्रवास करण्याची पाळी आली. दरम्यान एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ८५ टक्के फेऱ्या रद्द होऊन ४० लाखाचा फटका बसल्याची माहिती आहे.
वेतन वाढीवर नाराज झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी या बंदचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे भाकीत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. परंतु दुसऱ्या दिवशीही कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे एसटीची ८५ टक्के वाहतूक ठप्प होती. नागपूर विभागात सकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान एकूण १०७३ फेऱ्यांपैकी १५४ फेऱ्याच बाहेर पडल्या तर ९१९ बस फेऱ्या रद्द करण्याची पाळी महामंडळावर आली. यामुळे संपाच्या दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल झाले. अनेक प्रवाशांना खासगी बसेसने प्रवास करण्याची पाळी आली. संप सुरु असल्यामुळे असंख्य प्रवाशांनी आपला प्रवासाचा बेतच रद्द केला. संप सुरू असल्यामुळे एसटी महामंडळाच्या गणेशपेठ आगारात चालक-वाहक नारेबाजी करताना दिसले. संपावर तोडगा न निघाल्यास खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून दरवाढ करण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून यामुळे प्रवाशांची गैरसोय आणखी वाढणार आहे.
शनिवारी रात्री ८ पर्यंतची स्थिती
एकूण फेऱ्या १०७३
रद्द फेऱ्या ९१९
पूर्ण झालेल्या फेऱ्या १५४