‘सर्व्हर डाऊन’मुळे नागपूर विभागातील रेल्वे आरक्षण कार्यालयात प्रवाशांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 07:59 PM2018-04-26T19:59:51+5:302018-04-26T20:00:00+5:30
मुंबईवरून सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आरक्षण कार्यालयातील व्यवहार गुरुवारी दुपारी तब्बल अर्ध्या तासासाठी ठप्प झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईवरून सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आरक्षण कार्यालयातील व्यवहार गुरुवारी दुपारी तब्बल अर्ध्या तासासाठी ठप्प झाले होते. यामुळे आरक्षण कार्यालयात प्रवाशांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अखेर दुपारी २ वाजता सर्व्हर कनेक्ट झाल्यानंतर प्रवाशांना आरक्षणाचे तिकीट देणे सुरू झाले.
गुरुवारी दुपारी १.२५ वाजता अचानक मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या आरक्षण कार्यालयातील व्यवहार ठप्प झाले. यावेळी हजारो प्रवासी आरक्षणाचे तिकीट घेण्यासाठी रांगेत लागले होते. खूप वेळ होऊनही तिकीट मिळत नसल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घालणे सुरू केले. त्यानंतर त्यांना मुंबईवरून सर्व्हर डाऊन झाल्याचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, मुंबईवरूनच लिंक फेल असल्याची माहिती त्यांना मिळाली. अर्ध्या तासानंतर म्हणजे दुपारी २ वाजता सर्व्हर कनेक्ट झाल्यानंतर आरक्षण कार्यालयातील व्यवहार पूर्ववत सुरू झाले. परंतु नागरिकांना तब्बल अर्धा तास रांगेत उभे राहण्याची पाळी आली. यात नागपूर विभागातील नागपूर, अजनी, चंद्रपूर, बल्लारशा, आमला, बैतूल, सेवाग्राम, धामणगाव येथील आरक्षण कार्यालयात प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या.