प्रवासी रेल्वेची फेरी, किन्नर अन् गुन्हेगारी; सुरक्षित प्रवासाची घोषणा वाऱ्यावर
By नरेश डोंगरे | Published: January 4, 2024 11:00 PM2024-01-04T23:00:57+5:302024-01-04T23:01:41+5:30
सुरक्षित प्रवासाची घोषणा वाऱ्यावर : जनरलच्या प्रवाशांची सुरक्षा कागदावर
नागपूर : किन्नर आशीर्वाद देतात, ते मायाळू असतात असा सर्वसाधारण समज नागपुरातील किन्नरांच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे चुकीचा ठरू लागला आहे. बुधवारी मध्यरात्री धावत्या ट्रेनमध्ये किन्नरांनी चक्क लुटमार केली त्यामुळे किन्नरांची गुन्हेगारी पुन्हा चर्चेला आली आहे. दुसरीकडे 'रेल्वेचा प्रवास, भितीमुक्त प्रवास' ही घोषणा देखिल वल्गणा असल्याचे आणि रेल्वेतील जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा भगवान भरोसे असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा उघड झाले आहे.
आधी विशिष्ट सणावाराला किन्नर मंडळी शहरात फिरून दक्षिणा मागत होती. नंतर त्यांची रेल्वेगाडीत फेरी सुरू झाली. लग्न समारंभ, वाढदिवस, नवजात बाळाचे नामकरण, दुकान शोरूमचे उद्घाटन आणि अशाच शुभ कार्यस्थळी येऊन किन्नर 'भेट' मागायला लागले. नंतर त्यांनी रेल्वेगाड्यांमध्ये 'फेरी' सुरू केली अन् याचवेळी नागपुरातील विविध सिग्नलवर उभे राहूनही टाळ्या वाजवू लागले. त्यांचा लवकर आशीर्वाद मिळतो अशी भावना असल्याने किन्नरांना सदभावनेने लोक पैसे देऊ लागले. येथूनच ते बिघडल्यासारखे झाले. चांगले कलेक्शन होत असल्याने त्यांच्यातील वाद उफाळला. किन्नरांचे दोन गट पडल्याने त्यांनी नागपुरात आपापले क्षेत्र वाटून घेतले. यातून वर्चस्वाची लढाई सुरू झाली अन् किन्नरांनी कधी लकडगंज, एमआयडीसी, कधी तहसील, पाचपावली तर कधी गांधीबागमधील भरबाजारात गुंडगिरी सुरू केली. बाजारातील त्यांच्या हाणामाऱ्या, नंदनवन पोलीस ठाण्यात त्यांनी केलेली विकृती आणि नंतर शहरातील एका गटाच्या किन्नर नेता चमचमची दुसऱ्या गटातील किन्नरांनी केलेली हत्या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून देशभर चर्चेला आली होती. त्यानंतर मात्र पोलिसांनी कारवाईचा चाबूक ओढला. लडकगंज ठाण्यात बोलवून तत्कालीन पोलीस उपायुक्त आणि सध्याचे एसपी, एसीबी राहुल माकणिकर यांनी असे काही सरळ केले की तहसील, गांधीबाजारमधील धुडगुस बंदच झाला. चाैकाचाैकातील, सिग्नलवर दिसणारे किन्नरांचे थवेही दिसेनासे झाले. त्यांची नागपुरातील गुन्हेगारीही कमी झाल्याचे वाटत असतानाच बुधवारी मध्यरात्री पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नरांनी घातलेल्या धुडगूसामुळे त्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेला आली आहे.
कुठे असतात सशस्त्र गार्ड ?
रेल्वे गाड्यांमध्ये सशस्त्र गार्डचे सुरक्षा कवच असल्यामुळे प्रवासी बिनधास्त प्रवास करू शकतात, हा रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जाणारा दावाही 'शब्दच्छल' असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज मिळालेल्या माहितीनुसार, शेकडो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एका रेल्वेगाडीत फार तर चार किंवा पाच आरपीएफचे गार्ड असतात. ते शक्यतो एसी कोचच्या सुरक्षेकडे लक्ष पुरवितात. बुधवारी मध्यरात्री किन्नरांनी सुमारे अर्धा तास जनरल कोचमध्ये हैदोस घातला. प्रवासी दहशतीत येऊन आरडाओरड करत होते. यावेळी सशस्त्र गार्ड कुठे होते, ते मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
संपर्क क्रांतीमध्ये झाली होती हत्या
रेल्वे गाड्यांमधील किन्नरांची गुंडगिरी नवीन विषय नाही. रेल्वेचा स्टाफ आणि प्रवाशांच्या ती चांगली अंगवळणी पडली आहे. काही वर्षांपूर्वी एका किन्नराने एका रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केली होती. दोन वर्षांपूर्वी कळमना स्टेशनजवळ अशाच प्रकारे जनरल बोगीत शिरून गुन्हेगारांनी प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भीतीमुक्त प्रवासाच्या नियोजनाची जोरदार चर्चा झाली मात्र ती केवळ चर्चाच होती, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.