वारंवार रद्द होणाऱ्या आणि उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी त्रस्त
By नरेश डोंगरे | Published: August 22, 2024 06:25 PM2024-08-22T18:25:28+5:302024-08-22T18:28:26+5:30
Nagpur : अनेक दिवसांपासून विकासकामांचे दाखले देऊन विविध मार्गावरच्या गाड्या रद्द
नरेश डोंगरे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारंवार रद्द होणाऱ्या आणि उशिरा धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवासी अक्षरश: वैतागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही त्रासदायक मालिका कधी थांबणार, असा प्रश्न त्रस्त झालेले रेल्वे प्रवासी विचारत आहेत.
देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या सर्वच भागात रेल्वेगाड्या जातात आणि येतात. येथून ठिकठिकाणी जाणाऱ्या आणि येथे उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. रेल्वेने प्रवास करणारी मंडळी अनेक दिवसांपूर्वीच आपले प्रवासाचे नियोजन करून ठेवतात. कधी, कोणत्या गाडीने जायचे, कधी परत यायचे, हे खूप दिवसांपूर्वीच ठरवून तशा प्रकारे रिझर्वेशन केले जाते. असे असताना ऐनवेळी नियोजन केलेली गाडीच रद्द होत असेल किंवा उशिरा येत असेल तर प्रवासाचे नियोजन गडबडते. गाडी रद्द झाल्यास दुसऱ्या गाडीने जातो म्हटले तर पुन्हा रिझर्वेशनची अर्थात कन्फर्म तिकिटाची समस्या निर्माण होते. गेल्या अनेक दिवसांपासून विकासकामांचे दाखले देऊन विविध मार्गावरच्या गाड्या रद्द करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचप्रमाणे काही गाड्या विलंबाने नागपुरात पोहचत आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचे नियोजन रोजच्या रोज बिघडत आहे. रेल्वे प्रशासन रद्द करण्यात आलेल्या किंवा उशिरा पोहचणाऱ्या गाड्यांच्या संबंधाने दिलगिरी व्यक्त करून मोकळे होत आहेत. मात्र, महत्वाच्या कामासाठी, बैठकीसाठी, व्यवहाराच्या संबंधाने बोलणी करण्यासाठी अनेक दिवसांपूर्वीच नियोजन करून ठेवणाऱ्या प्रवाशांना मात्र त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील शेकडो रुग्ण रोज उपचारासाठी नागपुरात पोहचतात. व्यापारीही खरेदीच्या आणि देवाण-घेवाणीच्या निमित्ताने नागपुरात येतात. मात्र, गाडी रद्द होत असल्याने किंवा विलंबाने धावत असल्याने त्यांना एकाच दिवसात नागपुरात येऊन आणि येथून काम आटोपून परत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना येथे मुक्काम करण्यासाठी वेगळा खर्च करावा लागतो. वेळही जाते आणि त्रासही होतो. सारखे-सारखे गाड्या रद्द होण्याची आणि वेळेवर गाडी न पोहचण्याची मालिका सुरूच असल्याने ती कधी थांबणार, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.
कर्मचाऱ्यांनाही लेटलतिफीचा फटका
नागपूरहून नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या तसेच गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आदी ठिकाणाहून नोकरीच्या निमित्ताने नागपूरात येणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कार्यालयीन वेळ लक्षात ठेवून ही मंडळी रेल्वेने अपडाऊन करण्यासाठी घरून आणि कार्यालयातून बाहेर पडतात. मात्र, उपरोक्त प्रकारामुळे त्यांचेही अनेकदा नियोजन बिघडते. कार्यालयात पोहचण्यास त्यांना उशिर होतो, त्यामुळे कार्यालयीन कामावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे रेल्वेच्या लेटलतिफीचा फटका त्यांनाही सहन करावा लागत आहे.