रेल्वेत वाढली प्रचंड गर्दी, रिझर्वेशनसाठी धावपळ; प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 03:45 PM2022-10-17T15:45:28+5:302022-10-17T16:57:28+5:30
ऐन दिवाळीत अनेक रेल्वेगाड्या रद्द, प्रवाशांची कुचंबणा
नागपूर : दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची विविध रेल्वेमार्गावर मोठी गर्दी वाढत असताना विकासकामाच्या नावाने अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे संबंधित प्रवाशांची तीव्र कुचंबणा होत आहे. नियोजित ठिकाणी जाण्यासाठी दुसरा पर्याय शोधताना त्यांची मोठी धावपळ होत आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली, लखनऊ, कानपूर, गोरखपूर, अलाहाबाद, हावडा आदी मार्गांवर धावणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. आता ही गर्दी दिवाळीमुळे आणखीच वाढणार आहे. अशात अनेक मार्गावरच्या विकास कामामुळे काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी आधीच वेगवेगळ्या गाव, शहरांत जाण्याचे नियोजन केले, रिझर्वेशन करून ठेवले, त्यांची तीव्र कुचंबणा होत आहे. दुसरा पर्याय अथवा नव्याने दुसऱ्या मार्गाचे रिझर्वेशन करण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, रेल्वे बोर्डाचे चेअरमन, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पत्र वजा निवेदन लिहून प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष वेधले आहे. त्यानुसार, अनेक रेल्वेगाड्यांचा वेळ बदलला आहे. त्यामुळे रेल्वेचा ‘ट्रेन ॲट ए ग्लांस’ टाईम टेबल तातडीने प्रकाशित करण्याची गरज आहे. रेल्वेगाड्यांच्या साफसफाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणीही शुक्ला यांनी केेली आहे.
...तर संपूर्ण रक्कम परत करावी !
चार तासांपेक्षा जास्त लेट झालेल्या ट्रेनचे तिकीट रद्द करत असेल तर त्या प्रवाशाला शंभर टक्के तिकिटाची रक्कम परत मिळावी. सणासुदीच्या दिवसांत रेल्वेगाड्यांत चोर भामट्यांची संख्या वाढते. त्यामुळे ट्रेनमध्ये टीटीई आणि आरपीएफच्या जवानांची संख्या वाढवावी, अशी मागणीही शुक्ला यांनी निवेदनातून केली आहे. सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये एक एसी-१ कोच जोडण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.