प्रवाशांनो, रेल्वेत अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ घ्या; प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन

By नरेश डोंगरे | Published: May 13, 2024 08:09 PM2024-05-13T20:09:17+5:302024-05-13T20:09:46+5:30

मध्य रेल्वेकडून अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाईची मोहीम

Passengers, take food only from authorized vendors in the railways | प्रवाशांनो, रेल्वेत अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ घ्या; प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन

प्रवाशांनो, रेल्वेत अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ घ्या; प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन

नागपूर : प्रवाशांनी रेल्वे स्थानक परिसर किंवा रेल्वे गाड्यांमध्ये अधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडूनच खाण्यापिण्याच्या चिजवस्तू आणि पेये खरेदी करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आज एका प्रसिद्धीपत्रकातून केले आहे. लोकमतने गेल्या काही दिवसांत अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे वृत्त सातत्याने प्रकाशित करण्याची भूमिका घेतली आहे, हे विशेष !

विविध ठिकाणच्या रेल्वे स्थानक परिसरात आणि रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत विक्रेते (वेंडर) दर्जाहिन, शिळे खाद्यपदार्थ, विविध प्रकारची शितपेये आणि पाणी विकून प्रवाशांच्या आरोग्यांशी खेळत आहेत. बल्लारशाह आणि नागपूर रेल्वे स्थानकावर अशाच प्रकारे बिर्याणी विकण्यात आल्याने गोरखपूर एक्सप्रेसमधील ७० प्रवाशांना दोन आठवड्यांपूर्वी विषबाधा झाली होती. वर्धा स्थानकावर मुदतबाह्य दुध आणि कॉफीच्या पाकिटची विक्री करण्यात येत होती. तर, रेल्वे गाड्यांच्या टॉयलेटमध्ये चहा तयार करून विकला जात असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी, १३ मे च्या अंकात प्रकाशित केले होते. त्याची मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. आज या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धीपत्रक काढून प्रवाशांना खाण्या-पिण्याच्या चिजवस्तू रेल्वेच्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजवर ते तयार करण्यात आल्याची तारीख आणि वेळ एका स्टिकरवर नमूद असते. ते स्टिकर तपासण्याची विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे. ज्या पॅकेजवर तारीख आणि वेळ नमूद केलेले स्टिकर नसेल ते अन्न खरेदी करू नये. खबरदारीचा उपाय म्हणून खरेदी केलेले अन्न, शिजवल्यापासून चार तासांच्या आत खावे. त्याचप्रमाणे फक्त अधिकृत असलेले 'रेल नीर' हेच पिण्याचे पाणीच खरेदी करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
 
विक्रेत्याची शहानिशा करा, तात्काळ तक्रार करा
रेल्वे स्थानक किंवा गाड्यांमध्ये पदार्थ तसेच पेयाबद्दल किंवा ते विकणाऱ्यांबद्दल संशय आला तर तात्काळ १३९ क्रमांकावर तक्रार करा. 'रेल मदत' या पोर्टलवरही प्रवासी तक्रार नोंदवू शकतात, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
 
बल्लारशाह स्थानकावर पाण्याच्या बाटल्या जप्त
११ ते १३ मे २०२४ या तीन दिवसांत अनधिकृत वेंडरविरुद्ध राबविण्यात आलेल्या कारवाईच्या मोहिमेत रेल्वेच्या चमूंनी २१ वेंडरला अटक केली. तत्पूर्वी २७ विक्रेत्यांना पकडण्यात आले होते. १३ मे रोजी बल्लारशाह रेल्वे स्थानकावर प्रतिबंध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे ८ बॉक्स रेल्वे अधिकाऱ्यांनी पकडले आहे.

Web Title: Passengers, take food only from authorized vendors in the railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर