टीम इंडिया नागपुरात, प्रवाशांचे लगेज अहमदाबादेत; विमानतळावर गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 10:38 AM2023-02-03T10:38:07+5:302023-02-03T10:41:43+5:30
प्रवाशांच्या सीटवरही खेळाडूंचे साहित्य
वसीम कुरैशी
नागपूर : इंडिगाे एअरलाईन्सच्या विमानाने अहमदाबादहून नागपूरला आलेल्या सामान्य प्रवाशांना ‘आम आणि खास’ अशा भेदभावाचा सामना करावा लागला. भारतीय क्रिकेट टीमच्या सहा खेळाडूंच्यासाठी विमान कंपनीने सामान्य प्रवाशांचे सामान अहमदाबादमध्येच साेडून दिल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. नागपूरला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये पाेहोचल्यानंतरही प्रवाशांना त्यांचे लगेज कुठे आहे, याची माहिती मिळाली नाही. उलट सामान उचलणेच विसरल्याचे उत्तर एअरलाईन्स कर्मचाऱ्यांकडून मिळाल्याची माहिती प्रवाशांनी दिली.
इंडिगाे एअरलाईन्सचे ६ई-७२४७ हे विमान दुपारी १:३० वाजता अहमदाबादहून नागपूरसाठी रवाना झाले. ही फ्लाईट एटीआर विमानाद्वारे संचालित करण्यात येते, जिची प्रवासी क्षमता ७२ सीटची आहे. या विमानात टीम इंडियाचे काेच राहुल द्रविड, खेळाडू सूर्यकुमार, ईशान किशन व अक्षर पटेलसह दाेन इतर खेळाडू बसले हाेते. ९ फेब्रुवारीपासून भारत व ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसाेटी सामन्यासाठी हे खेळाडू नागपूरला आले आहेत. याच विमानात नागपूरचे सराफा व्यापारी विशाल पारेख, त्यांची पत्नी वीणा पारेख, भरत देसाई, प्रीती देसाई यांच्यासह इतर २० प्रवासी बसले हाेते. या प्रवाशांचे सामानच अहमदाबादहून आणण्यात आले नाही. विमानातील रिक्त सीट्सवर खेळाडूंचेच सामान ठेवण्यात आल्याचे विशाल पारेख यांनी सांगितले. विमानात त्यांचे लगेज आणण्यात येणार नसल्याची माहिती न दिल्याने पारेख यांनी नाराजी व्यक्त केली.
तासभर करावी लागली लगेजची प्रतीक्षा
विशाल पारेख यांनी सांगितले, विमानातून उतरल्यानंतर नागपूर विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये प्रवाशांना एका तासापेक्षा अधिक काळ सामानाची प्रतीक्षा करावी लागली. यानंतर विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे सामान अहमदाबादमध्येच विसरल्याची माहिती दिली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एक माेबाइल क्रमांक देऊन सामान परत बाेलविण्यासाठी संपर्क करण्याची सूचना करीत आपली जबाबदारी झटकली. याहून वाईट म्हणजे प्रवाशांकडून एक फार्म भरण्यात आला, ज्यामध्ये त्यांना सामानाच्या माहितीसह घरचा पत्ता आणि माेबाइल नंबरची माहिती घेण्यात आली.
२४ तासांनंतर पाेहोचेल लगेज
इंडिगाेच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या प्रवाशांचे लगेज अहमदाबादला साेडण्यात आले, ते गुरुवारी रात्री ११:३० वाजता इंडिगाेच्या मुंबई-नागपूर विमानाने पाेहोचविण्यात येणार आहे. यानंतरच शुक्रवारी ते सर्व प्रवाशांच्या घरापर्यंत पाेहोचविले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे प्रवाशांना त्यांच्याच सामानासाठी २४ तास वाट पाहावी लागणार आहे.