‘त्या’ संचालकाचे अन्य साथीदार पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:04+5:302021-02-05T04:38:04+5:30
उमरेड : लाखो रुपयांच्या गुंतवणुकीचे जाळे विणत केवळ १८ महिन्यात दामदुप्पट रक्कम परत करून देण्याचा गोरखधंदा उजेडात आल्यानंतर उमरेड ...
उमरेड : लाखो रुपयांच्या गुंतवणुकीचे जाळे विणत केवळ १८ महिन्यात दामदुप्पट रक्कम परत करून देण्याचा गोरखधंदा उजेडात आल्यानंतर उमरेड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात एकमेकांना सोबत घेत अनेकांचे घर गाठणारे अन्य काही साथीदार सुद्धा पसार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. एजीएम कॉर्पेोरेशन डिजिटल अॅडव्हर्टाईजमेंट या कंपनीने केलेल्या ३० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अजय कृष्णराव लधवे (४७, इतवारी पेठ, उमरेड) याला शनिवारी (दि.३०) गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने जेरबंद केले. या कंपनीचे सुशील रमेश कोल्हे, पंकज रमेश कोल्हे आणि भरत शाहू हे अन्य तीन मुख्य संचालक भूमीगत झालेत. लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करणाऱ्यांमध्ये केवळ ही चौकडी नसून त्यांना साथ देणारे अन्य काही साथीदार सुद्धा असल्याचे तपासात पुढे येत आहे. सुमारे दोन वर्षांपासून असंख्य तरुणांची साखळीच या गोरखधंद्यात सहभागी होती. उमरेड परिसरातील मित्रपरिवार आणि ओळखीच्या लोकांकडून सुद्धा लाखो रुपयांची माया या कंपनीच्या माध्यमातून गोळा करण्यात आली आहे. ज्या लोकांनी या कंपनीत ही रक्कम गुंतविली त्यांनी पुढाकार घेतल्यास या प्रकरणाची पाळेमुळे उघडकीस येणार आहे. शहरातील काही संस्थांमध्ये आरोपी अजय लधवे कार्यरत आहे.
प्लॉटचेही आमिष
लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या लोकांना १८ महिन्यात दुप्पट रक्कम, स्क्रीनवर डिजिटल जाहिरात सोबतच अधिकची गुंतवणूक करणाऱ्यांना प्लॉटचेही आमिष दाखविले जात होते. उमरेड येथीलच चारचौघांची ही टोळी अधिकांश लोकांकडे पोहोचली. या ‘डबल धमाका’ ऑफरच्या जाळ्यात काही फसले तर काहींनी हुशारी दाखवित जैसे थे परिस्थितीत जगणे पसंत केल्याने बहुसंख्य या फसवेगिरीच्या गोरखधंद्यात वाचले.