‘पासपोर्ट’च्या मागणीत वाढ
By admin | Published: October 17, 2016 02:44 AM2016-10-17T02:44:21+5:302016-10-17T02:44:21+5:30
उपराजधानीतील नागरिकांमध्ये ‘पासपोर्ट’ काढण्यासंदर्भात जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
साडेतीन वर्षातील आकडेवारी : ‘पासपोर्ट’ शुल्कातून ६२ कोटींचा महसूल
नागपूर : उपराजधानीतील नागरिकांमध्ये ‘पासपोर्ट’ काढण्यासंदर्भात जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या साडेतीन वर्षांत साडेतीन लाखांहून अधिक ‘पासपोर्ट’ जारी करण्यात आले आहे. तर ‘पासपोर्ट’साठी असलेल्या निर्धारित शुल्कातून सुमारे ६२ कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. दरवर्षी ‘पासपोर्ट’साठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढतच आहे. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर येथील ‘पासपोर्ट’ कार्यालयाकडे १ एप्रिल २०१३ ते ३० आॅगस्ट २०१६ या कालावधीत जारी करण्यात आलेल्या ‘पासपोर्ट’बाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. या कालावधीत किती ‘पासपोर्ट’ जारी करण्यात आले, यातून किती शुल्क मिळाले, किती अर्ज प्रलंबित आहेत यासारखे प्रश्न विचारण्यात आले होते. यासंदर्भात पारपत्र कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी ए.आर.सोनकुसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत ३ लाख ७८ हजार २५९ लोकांनी ‘पासपोर्ट’साठी अर्ज केले. यातील ३ लाख ५९ हजार ९४२ व्यक्तींना ‘पासपोर्ट’ जारी करण्यात आले. तर ५ हजार ६७७ नागरिकांना ‘पीसीसी’ (पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट) देण्यात आले. ‘पासपोर्ट’ तसेच ‘पीसीसी’च्या शुल्कातून ६२ कोटी ९ लाख ६२ हजार २०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. (प्रतिनिधी)
आठ महिन्यांत ८२ हजार ‘पासपोर्ट’ जारी
२०१३ पासून अर्ज व प्रत्यक्ष जारी झालेले ‘पासपोर्ट’ यांच्या संख्येतदेखील सातत्याने वाढ होत आहे. २०१६ च्या पहिल्या आठ महिन्यांतच ‘पासपोर्ट’साठी ८२ हजार ९११ अर्ज आले. यातील ७७ हजार ९१४ नागरिकांना ‘पासपोर्ट’ जारी करण्यात आले. २०१३ मध्ये आलेल्या अर्जांचा आकडा हा ८१ हजार ४७१ इतका होता.