चार महिन्यात ९३७० खड्डे बुजवले, तर नागपूरच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 10:00 AM2018-08-09T10:00:38+5:302018-08-09T10:01:03+5:30

चार महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरातील विविध रस्त्यांवरील ९ हजार ३७० खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. असे असतानाही रस्त्यांवर खड्डे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

In the past 4 months, 9 370 potholes have been finished, how to pitch again on the streets of Nagpur? | चार महिन्यात ९३७० खड्डे बुजवले, तर नागपूरच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे कसे?

चार महिन्यात ९३७० खड्डे बुजवले, तर नागपूरच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे कसे?

Next
ठळक मुद्देसिमेंट रोड असलेल्या मार्गावरील खड्ड्यांचाही समावेश

गणेश हूड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्याला सुरुवात झाली की शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर खड्डे पडतात. महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाकडे खड्डे बुजविण्याची जबाबदारी आहे. खड्डे बुजविण्यावर दरवर्षी कोट्यवधीचा खर्च केला जातो. प्रत्यक्षात तक्रार करूनही खड्डे बुजवले जात नाहीत, असा शहरातील नागरिकांचा अनुभव आहे. एप्रिल ते जुलै या गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत शहरातील विविध रस्त्यांवरील ९ हजार ३७० खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. असे असतानाही शहरातील रस्त्यांवर खड्डे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
हॉटमिक्स विभाग जेटपॅचरसह तीन मशीनच्या साह्याने रस्ते दुुरुस्ती व खड्डे बुजवण्याचे काम करतो. आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक १५६६ खड्डे बुजवण्यात आलेले आहेत. तर सतरंजीपुरा झोनमध्ये सर्वात कमी ५१८ खड्डे बुजविण्यात आलेले आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवण्यासाठी तरतूद केली जाते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अर्थसंकल्पात तरतूद केली तरी प्रत्यक्षात त्यानुसार निधी उपलब्ध होत नाही. मागील तीन वर्षात ११६.१४ कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात २४ कोटींचा निधी उपलब्ध झाला. वर्षाला ८ ते ९ कोटी रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीवर खर्च केले जातात. एप्रिल ते जुलै या कालावधीत पाच ते सात कोटींचा खर्च करण्यात आला. परंतु त्यानंतरही रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी बनविण्यात आलेल्या सिमेंट रोडचाही खड्डे बुजवण्यात आलेल्या ठिकाणात समावेश आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

२.१० लाख चौरस फूट खड्डे दुरुस्तीचा दावा
हॉटमिक्स विभागाने गेल्या चार महिन्यात नादुरस्त रस्त्यांवर बुजवण्यात आलेल्या खड्ड्यांचे क्षेत्रफळ २ लाख १० हजार ५५ चौ.फूट आहे. तसेच १ हजार ४८६ पॅचेस बुजवण्यात आले आहेत. याचे क्षेत्रफळ १७ हजार २७१ चौ. फूट आहे.

खड्डे पावसामुळे, बुजवण्याचे काम सुरू
आयआरडीपी रोड बनविण्याला १७ ते १८ वर्षे झालेली आहेत. रोडच्या बाजूला असलेल्या पावसाळी नाल्या व्यवस्थित नसल्याने पावसाचे पाणी रोडवर साचते. अनेक रस्ते दुरुस्तीला आलेले आहेत. तसेच शहरात मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडतात. चार महिन्यात हॉटमिक्स विभागातर्फे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ९३७० खड्डे बुजवण्यात आलेले आहेत. यावर दोन ते तीन कोटींचा खर्च झालेला आहे.
- यू.बी. लांजेवार,
यांत्रिकी अभियंता(हॉटमिक्स)

Web Title: In the past 4 months, 9 370 potholes have been finished, how to pitch again on the streets of Nagpur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.