उपक्रमशील शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:30+5:302021-04-02T04:07:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिक्षकांच्या अभिनव उपक्रमांपासून अन्य शिक्षकांना प्रेरणा मिळावी व त्याच्यात सर्जनशील कल्पकतेला व्यासपीठ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षकांच्या अभिनव उपक्रमांपासून अन्य शिक्षकांना प्रेरणा मिळावी व त्याच्यात सर्जनशील कल्पकतेला व्यासपीठ मिळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी गुरुवारी सावनेर येथे केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये गुणवत्ता विकासासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांच्या कामापासून प्रेरणा मिळण्यासाठी आज जिल्हा परिषद मुख्याधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या उपस्थितीत आज सावनेर येथील मूकबधिर निवासी शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमिक तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, गट शिक्षणाधिकारी (काटोल) दिनेश धवड, गट शिक्षणाधिकारी विशाल गौर, विजय भाकरे, दीपक गरुड उपस्थित होते.
काटोल, नरखेड, सावनेर या तीन तालुक्यांतील प्रत्येकी दोन शिक्षकांनी त्यांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांचे सादरीकरण यावेळी केले. कोरोनानंतरच्या काळामध्ये अध्यापनाच्या दृष्टीने नियोजनाच्या सूचना कुंभेजकर यांनी केल्यात. बेस्ट प्रॅक्टिसेसच्या सादरीकरणातून समोर आलेल्या नवीन उपक्रमांची आपल्या कार्यक्षेत्रात कशी अंमलबजावणी करता येईल, याचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.