पतंजली फूड व हर्बल पार्कचे उद्या भूमिपूजन
By admin | Published: September 9, 2016 03:11 AM2016-09-09T03:11:05+5:302016-09-09T03:11:05+5:30
मिहानमधील बहुचर्चित पतंजली फूड आणि हर्बल पार्कचे भूमिपूजन शनिवारी, १० सप्टेंबरला होणार आहे.
मिहानमध्ये २३० एकर जागेत प्रकल्प : पतंजलीचे एक लाख साधक येणार
नागपूर : मिहानमधील बहुचर्चित पतंजली फूड आणि हर्बल पार्कचे भूमिपूजन शनिवारी, १० सप्टेंबरला होणार आहे. या समारंभात आतापर्यंतचा कॉर्पोरेटचा शिष्टाचार मोडून पतंजलीचे लाखांहून अधिक साधक एकत्रित येणार आहे. तसेच यावेळी शेतकरी संमेलनसुद्धा होणार आहे.
भूमिपूजनाची सुरुवात यज्ञाने होणार आहे. भूमिपूजनाची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू असून पतंजलीचे वरिष्ठ पदाधिकारी तयारीवर लक्ष ठेवून आहेत. कार्यक्रमासाठी पतंजली किसान सेवा समिती सक्रिय झाली आहे. स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण शुक्रवार, ९ सप्टेंबरला नागपुरात येत आहेत. सकाळी १० ते ११ या वेळेत यज्ञ, ११ वाजता शिलान्यास आणि दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ११ ते १ या वेळेत भूमिपूजन समारंभ होणार आहे. या समारंभात मुख्य अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि विशिष्ट अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड या कंपनीला मिहानमध्ये २५.५० लाख रुपये एकरी भावात २३० एकर अविकसित जमीन दिली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलीकडेच पतंजली किसान सेवा समितीची बैठक झाली. निर्णयानुसार भूमिपूजन समारंभात एक लाखापेक्षा जास्त साधक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. नागपूरसह बुलडाणा, नांदेड, वाशीम, वर्धा, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदियासह संपूर्ण विदर्भातील साधक उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्वसामान्यांना खुले निमंत्रण देण्यात आले आहे. नागरिकांना भूमिपूजनस्थळी येण्यासाठी बसेसची सोय करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)