पतंजलीने डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष उत्पादन सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:31+5:302021-07-09T04:07:31+5:30
नागपूर : दोन ते तीन वर्षांपासून मशीनरीची उभारणी केल्यानंतरही काही अडचणींमुळे प्रत्यक्ष उत्पादन सुरू न केलेल्या पतंजलीने डिसेंबर २१पर्यंत ...
नागपूर : दोन ते तीन वर्षांपासून मशीनरीची उभारणी केल्यानंतरही काही अडचणींमुळे प्रत्यक्ष उत्पादन सुरू न केलेल्या पतंजलीने डिसेंबर २१पर्यंत प्रत्यक्ष उत्पादन सुरू करावे, असे निर्देश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसीचे) व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी येथे दिले.
दीपक कपूर यांनी गुरुवारी मिहानमधील विविध कंपन्यांना भेट देऊन पाहणी केली. त्यांनी एअर इंडिया एमआरओ, डसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड (डीआरएएल), पतंजली फूड पार्क आणि फ्यूचर सप्लाय चेनच्या विकासकामांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
पतंजली फूड पार्कने मिहान आणि सेझमध्ये २३२ एकर जागा घेतली आहे. १२ लाख चौरस फुटापेक्षा जास्त औद्योगिक हँगरसह दोन ते तीन वर्षांपूर्वी आवश्यक मशीनरीची उभारणी केली आहे. एमएडीसी आणि शासनाचे सहकार्य आणि मदत करण्यात येणार असून डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष उत्पादन सुरू करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. एमआरओचे महाव्यवस्थापक सत्यवीर सिंग यांनी त्यांचे स्वागत केले आणि प्रकल्पाची माहिती दिली. डीआरएएलमध्ये सीईओ अरविंद कुमार, सीओओ जेम लुक आणि डेव्हिड राजू यांनी कपूर यांचे स्वागत केले आणि व्यावसायिक विमान फाल्कन २०००च्या उत्पादन प्रक्रियेची माहिती दिली. हा प्रकल्प ३ लाख चौरस फूट जागेत असून फाल्कन व्यावसायिक विमान नागपूर विमानतळावरून डिसेंबर २०२२ मध्ये उडणार आहे. येथे दोन हँगर असून ९० टक्के कर्मचारी विदर्भातील आहेत. फ्यूचर ग्रुपमध्ये झोनल एचआर प्रमुख विपीन तेलगोटे यांनी त्यांचे स्वागत केले. व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, सचिव गौरव सारडा यांनी मिहानमध्ये लहान प्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी कपूर यांच्याकडे केली. मिहानमध्ये ६.८ एकर जागा पंचतारांकित हॉटेल्ससाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. या क्षेत्रातील व्यावसायिकांसोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेणार असल्याचे कपूर म्हणाले. कपूर यांनी एमएडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत विकासकामांवर चर्चा केली.