कायदेशीर बाबींमुळे ‘पतंजली’ रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 01:40 AM2017-09-13T01:40:07+5:302017-09-13T01:40:07+5:30
कायदेशीर बाबी आणि काही विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यामुळे मिहानमधील पतंजली प्रकल्पातील उत्पादन वेळेत सुरू होऊ शकले नाही, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कायदेशीर बाबी आणि काही विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यामुळे मिहानमधील पतंजली प्रकल्पातील उत्पादन वेळेत सुरू होऊ शकले नाही, अशी खंत रामदेव बाबा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाली असून, पतंजली प्रकल्पात याच महिन्यात हजारो लोक काम करताना दिसतील, अशी घोषणा त्यांनी केली.
एक वर्षापूर्वी प्रकल्पाचे भूमिपूजन करताना सहा महिन्यातच प्रकल्प सुरू होईल, अशी घोषणा रामदेव बाबा यांनी व्यासपीठावरून हजारो लोकांसमोर केली होती, हे विशेष. रामदेव बाबा म्हणाले, मी देशविकासासाठी काम करीत आहे. काही प्रश्नांवरून राजकीय लोक विनाकारण मला गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांना घाबरणारा नाही. अशांकडे दुर्लक्ष केलेले बरे, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्लास्टिकला ‘बायबाय’
एका प्रश्नाच्या उत्तरात रामदेव बाबा म्हणाले, उत्पादनाच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकशिवाय पर्याय नाही. पण त्याचाही पर्याय आम्ही शोधला आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याचा उपयोग करण्यात येत आहे. आम्ही पर्यावरणमित्र आहोत. देशात पतंजलीचे जवळपास पाच हजार सेंटर आहेत. प्लास्टिकचा एक तुकडाही पतंजली प्रकल्पात दिसणार नाही, लवकरच ‘बायबाय’ करू, असे त्यांनी स्पष्ट केले. मी घातलेले कपडे सुती असून हाताने तयार केले आहेत, असे ते म्हणाले.
संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचा श्रीगणेशा पुढील वर्षी
देशातील पहिला मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प पुढील वर्षी नागपूरलगत सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्यातीत मालाचे उत्पादन करण्याचा मानस असून देशांतर्गतही विक्री होईल.अखेर त्यांनी बाबा कसा असावा, यावर सोदाहरण मत मांडले. ज्यांच्यात साधेपणा नाही, ते बाबा नाहीत. साधू म्हणजे चालते-फिरते तीर्थ म्हटले आहे. परोपकार करतात तो साधू, असे रामदेव बाबा यांनी सांगितले.
चुकीचे काम करणाºया बाबांवर कारवाई व्हावी
कुप्रसिद्ध बाबांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी टीकास्त्र सोडले आहे. बाबा राम रहीमवर झालेली कारवाई योग्यच आहे. जो बाबा चुकीचे कार्य करत असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. ‘पतंजली’च्या वितरकांच्या संमेलनासाठी ते नागपुरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राम रहीमसारख्या व्यक्तींना कायद्याची भाषा समजावलीच पाहिजे, असेदेखील बाबा रामदेव म्हणाले. दरम्यान कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केलेल्या टीकेवर बाबा रामदेव यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांचे देशाकरिता काही योगदान नाही, दिवसभर नुसते बकवास करत असतात त्यांच्याबाबत उत्तर देण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आखाडा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव नसल्याबाबत सवाल करत काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून रामदेवबाबांना लक्ष्य केले होते.
पुढील वर्षात दोन वा तीन हजार कोटींचा कच्चा माल खरेदी करणार
पतंजली समूहातर्फे देशातील शेतकºयांकडून दरवर्षी १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कच्च्या मालाची खरेदी करण्यात येते. आॅलिव्हराचा त्यात केवळ ५ टक्के वाटा आहे. येथील शेतकºयांकडून कच्च्या मालाची खरेदी करण्यात येणार आहे. अनेक कच्च्या मालापासून पतंजलीची उत्पादने तयार होतात. पुढील वर्षात दोन किंवा तीन हजार कोटी रुपयांचा कच्चा माल बाजारातून जास्त भावातच खरेदी करण्यात येणार आहे. त्याचा शेतकºयांना फायदाच होणार आहे. शिवाय विदर्भातील शेतकºयांचे उत्पादन खरेदी करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी समूह कटिबद्ध आहे.