एसटी महामंडळाचा पेट्रोल पंप सुरू होण्यासाठी जमिनीचा पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:37+5:302021-07-14T04:09:37+5:30
लोकमत विशेष आनंद शर्मा नागपूर : कोरोनाच्या काळात उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पेट्रोल-डिझेल विकण्यासाठी प्रकल्प ...
लोकमत विशेष
आनंद शर्मा
नागपूर : कोरोनाच्या काळात उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पेट्रोल-डिझेल विकण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याचा विचार केला होता. त्यानुसार नागपूर विभागातील वर्धमाननगरात पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार होता. परंतु सूत्रानुसार हा पेट्रोल पंप सुरू होण्यात जमिनीचा पेच निर्माण झाल्यामुळे हा प्रकल्प थंडबस्त्यात पडला आहे.
कोरोनामुळे काळात अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. यात व्यापारी आणि शासकीय विभागाचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक स्थितीही बिकट झाली आहे. लॉकडाऊनमुळे बसेस बंद असल्यामुळे उत्पन्न कमी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात अडचण येत आहे. अशास्थितीत मागील वर्षी उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर करून माल वाहतुक सुरू केल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली होती. त्यानंतर महामंडळाने पेट्रोल-डिझेल विकण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार संपूर्ण राज्यात ३० पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार होते. त्यातील एक पेट्रोल पंप नागपूर विभागातील वर्धमाननगरात सुरू करण्यात येणार होता. परंतु त्यात आता पेच निर्माण झाला आहे. सूत्रांच्या मते, ऑईल कंपनीशी झालेल्या करारानुसार पेट्रोल पंप महामंडळाच्या जागेवरच सुरू केला जाऊ शकतो. परंतु वर्धमाननगर येथील जमीन महामंडळाने लीजवर घेतली आहे. त्यामुळे हा प्रकल्प थंडबस्त्यात पडला आहे. असाच दुसरा पेट्रोल पंप वर्धा विभागात समुद्रपूर येथे सुरू होणार आहे.
...................
एसटी महामंडळ-आयओसीमध्ये झाला करार
कोरोनाच्या काळात एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने इंडियन ऑईल काॅर्पोरेशन(आयओसी)सोबत ऑगस्ट २०२० मध्ये करार केला होता. दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. या करारांतर्गत एसटी महामंडळ राज्यात ३० ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करून वाहनचालकांना पेट्रोल-डिझेलची विक्री करणार होते.
नागपुरात पेट्रोल पंपाचा प्रस्ताव
‘एसटी महामंडळ आणि इंडियन ऑईल काॅर्पोरेशनमध्ये झालेल्या करारानुसार नागपूरच्या वर्धमाननगरात पेट्रोल पंप प्रस्तावित आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे.’
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर विभाग
.............