विषाणू प्रयोगशाळा बंद होण्याच्या मार्गावर

By admin | Published: May 7, 2016 02:55 AM2016-05-07T02:55:05+5:302016-05-07T02:55:05+5:30

देशात विषाणूचा वाढता विळखा लक्षात घेऊन कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रात केवळ इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...

The path to the closure of the bacterial laboratory | विषाणू प्रयोगशाळा बंद होण्याच्या मार्गावर

विषाणू प्रयोगशाळा बंद होण्याच्या मार्गावर

Next

स्वाईन फ्लूसह इतर नमुन्यांची तपासणी बंद : मेयो प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका
सुमेध वाघमारे नागपूर
देशात विषाणूचा वाढता विळखा लक्षात घेऊन कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रात केवळ इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेला (व्हीआरडीएल) मंजुरी दिली. सुरुवातीच्या पाच वर्षांच्या खर्चाचा ७५ टक्क्यांचा वाटा केंद्र सरकार तर उर्वरित २५ टक्क्यांचा वाटा राज्य सरकारने उचलायचा होता. केंद्राने निधीही दिला. परंतु मेयो प्रशासनाने या निधीच्या खर्चाचा हिशेबच दिला नाही.
परिणामी, दुसऱ्या टप्प्यातील निधी गोठविण्यात आला. या शिवाय, प्रयोगशाळेत काम करणाऱ्या संशोधन शास्त्रज्ञासह इतरही जणांच्या कंत्राटाचे नूतनीकरण झाले नाही. यामुळे गेल्या २६ एप्रिलपासून स्वाईन फ्लूसह इतर महत्त्वाचे नमुने तपासणी बंद आहे. विदर्भातील एकमेव विषाणू प्रयोगशाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे.
‘मर्स कोरोना’, ‘ईबोला’, ‘झिका व्हायरस’ या नवीन विषाणूने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याला फार गंभीरतेने घेतले आहे. या विषाणूसोबतच ‘एच-७ एन-९’ या विषाणूची भर पडली आहे. भारतात या आजाराचे रुग्ण आढळून आले नसले तरी भविष्यात ते आढळण्याची शक्यता आहे.
एच १ एन १ या स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रकोप भारतात अद्यापही कमी झालेला नाही. विदर्भात आजही या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. मागील तीन वर्षांत डेंग्यूच्या आजाराच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. एकट्या नागपूर विभागात गेल्या वर्षी ७५८ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून १७० वर रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


पुण्याला पाठविले जायचे नमुने
२००९ मध्ये विदर्भात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले. स्वाईन फ्लूसह, डेंग्यू व इतरही विषाणूजन्य संशयितांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी जायचे. तपासणीचा अहवाल येईपर्यंत साधारण पाच दिवस लागायचे. आजाराचे निदान होण्यास उशीर व्हायचा. यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक राहायची. यात शासनाचा मोठा निधीही खर्च व्हायचा. यावर उपाय म्हणून इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) २०११-१२ मध्ये ‘मेयो’रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत स्वाईन फ्लूचे नमुने तपासण्याची तात्पुरती सोय करून दिली. परंतु येथे मर्यादित नमुनेच तपासले जात असल्याने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेवरील भार कमी झालेला नव्हता.

२०१५ पासून विषाणू प्रयोगशाळेला सुरुवात
देशात वाढत्या विषाणुजन्य आजाराचा धोका लक्षात घेऊन २०१३-१४ मध्ये केंद्राने दोन प्रादेशिक, चार राज्यस्तरीय व देशातील आठ मेडिकल कॉलेजमध्ये विषाणू प्रयोगशाळेला (व्हीआरडीएल) मंजुरी दिली. यात महाराष्ट्राच्या वाट्याला नागपुरातील मेयो रुग्णालयाला विषाणू प्रयोगशाळा आली. २०१४-१५ मध्ये प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. एप्रिल-२०१५ मध्ये या प्रयोगशाळेसाठी दोन संशोधन शास्त्रज्ञ, दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक संशोधन सहायक अशा पाच जणांना एक वर्षाचे कंत्राट देऊन नेमणूक करण्यात आली. याच काळात स्वाईन फ्लू व डेंग्यूचा प्रकोप वाढला होता. विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेशातील स्वाईन फ्लूचे १६०० तर डेंग्यूचे ३००० नमुने तपासण्यात आले. परंतु एप्रिल २०१६ रोजी यातील काही जणांचे कंत्राट संपले. नवे कंत्राट अद्यापही देण्यात न आल्याने नमुने तपासणी बंद झाल्याची माहिती आहे.

कंत्राटाचे नूतनीकरण
नाही
‘व्हीआरडीएल’मध्ये येणाऱ्या संशयित स्वाईन फ्लूचे नमुने कमी झालेले आहेत. एक वर्षाच्या कंत्राटपद्धतीवर प्रयोगशाळेत काम करणाऱ्यांमधून काही जणांचे कंत्राट संपले आहेत. अनुदान मिळाले नसल्याने त्यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही.
-डॉ. सुनीता गजभिये
नोडल अधिकारी, व्हीआरडीएल

Web Title: The path to the closure of the bacterial laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.