श्रेष्ठत्वाचा मार्ग अंतर्मनाच्या आनंदातूनच

By Admin | Published: November 17, 2014 12:56 AM2014-11-17T00:56:17+5:302014-11-17T00:56:17+5:30

प्रत्येकाच्या आयुष्यात निरनिराळ्या प्रकारची दु:ख आहेत. परंतु जीवन जगताना त्यांना कवटाळण्यापेक्षा अंतर्मनातील आनंद शोधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आनंदी व्यक्तींनाच श्रेष्ठत्व प्राप्त होते.

The path of superiority is through the joy of inner self | श्रेष्ठत्वाचा मार्ग अंतर्मनाच्या आनंदातूनच

श्रेष्ठत्वाचा मार्ग अंतर्मनाच्या आनंदातूनच

googlenewsNext

निधी चैतन्य : भगवद्गीतेचे सार संसारिक व्यक्तींसाठीच
नागपूर : प्रत्येकाच्या आयुष्यात निरनिराळ्या प्रकारची दु:ख आहेत. परंतु जीवन जगताना त्यांना कवटाळण्यापेक्षा अंतर्मनातील आनंद शोधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आनंदी व्यक्तींनाच श्रेष्ठत्व प्राप्त होते. भगवद्गीतेत हीच बाब वारंवार अधोरेखित करण्यात आली आहे, या शब्दांत चिन्मय मिशनच्या ब्रह्मचारिणी निधी चैतन्य यांनी गीतेमधील भावार्थाचे सार मांडले. ‘सप्तक’ तसेच काळे फाऊंडेशन ट्रस्टतर्फे लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृह येथे आयोजित ‘मंत्रास्-२०१४’ या व्याख्यानमालेदरम्यान ‘एक्सलन्स थ्रू भगवद्गीता’ या विषयावर त्यांनी यथार्थ विवेचन केले.
महाभारतातील अर्जुन आणि आजच्या युगातील सामान्य व्यक्ती यांच्या अडचणी व समस्या एकच होत्या. त्यांची व्याप्ती वेगवेगळी असली तरी त्यांचे कारण सारखेच आहे. आयुष्यात यश मिळते ते कौशल्य आणि क्षमतेवरून. अनेकांमध्ये कौशल्य असते, परंतु ते अंतर्गत म्हणजेच मनाच्या क्षमतेत कमी पडतात. त्यामुळे ते संभ्रमात पडतात व ते तणावात राहतात. विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये तर हा प्रकार वाढीस लागला आहे. अंतर्गत क्षमता, आत्मविश्वास जागविण्यात शिक्षणप्रणाली मागे पडते आहे अन् त्यामुळे विद्यार्थी लहान वयातच तणावाचे बळी ठरत आहेत असे मत ब्रह्मचारिणी निधी चैतन्य यांनी व्यक्त केले.
महाभारताच्या रणांगणावर भगवद्गीतेचे उद्बोधन झाले. गीता ऐकणारा अर्जुन असो किंवा सांगणारा कृष्ण, दोघेही संसारिक होते आणि त्यांच्यासमोर अडचणी होत्याच. सामान्य मनुष्य अनेकदा मला खूप कठीण परिस्थिती सहन करावी लागत आहे, अशी तक्रार करतात. परंतु महाभारतातील दु:खांशी आपल्या आयुष्यातील लहानसहान अडचणींची तुलना केली तर नक्कीच मनाला दिलासा मिळेल. गीतेचा संदेश हा संन्यासीजनांसाठीच नाही तर संसारिक जीवनात असलेल्या नागरिकांसाठीदेखील आहे. गीतेचे अस्तित्व केवळ देवघरापुरते मर्यादित न राहता घराच्या सर्व कोपऱ्यात तिचा संदेश पोहोचला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.
ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग यांच्या माध्यमातून आयुष्यात शांती व समाधान कसे काय प्राप्त करता येईल याचा भावोपदेश गीतेमध्ये देण्यात आला आहे. ज्ञानयोगामुळे ज्ञानाची व्याप्ती वाढते. भक्तियोगामुळे प्रेमभावना वाढते तर कर्मयोगामुळे जे काम केले त्याचा निकाल जसा आहे तसा स्वीकारण्याची शक्ती मिळते असे ज्ञानामृत निधी चैतन्य यांनी दिले. मनुष्याच्या आयुष्यात बदलांना फार मोठे स्थान आहे. बदलांसाठी हिंमत व त्याग फार आवश्यक आहे. गीता हे आनंद, ज्ञान, समाधान, स्वीकार, त्याग या गुणांचे भंडार आहे व आजच्या युगातदेखील त्याचे महत्त्व अबाधित आहे असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमप्रसंगी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. यावेळी ब्रह्मचारिणी निधी चैतन्य यांनी उपस्थितांच्या प्रश्नांनादेखील समर्पक उत्तरे दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The path of superiority is through the joy of inner self

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.