नागपुरात बायोवेस्टमुळे इमारत बनली मिनी डम्पिंग यार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 07:00 AM2020-09-05T07:00:00+5:302020-09-05T07:00:05+5:30
नागपुरात रामदासपेठेतील ध्रुव पॅथोलॉजी लॅब असलेली संपूर्ण इमारत जैविक कचऱ्यामुळे (बायोवेस्ट) मिनि डम्पिंग यार्डमध्ये रुपांतरित झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जसजसे शासनाकडून कोरोनो संदर्भात उपचार व चाचणीची परवानगी खाजगी रुग्णालये आणि पॅथोलॉजी लॅब्सला देण्यात येत आहेत, तसतसे रुग्णांसोबचे व्यवहार, व्यवस्थापनाबाबत त्यांच्याकडून उद्दामपणा व्यक्त होत असल्याचे उघडकीस येत आहे. रामदासपेठेतील ध्रुव पॅथोलॉजी लॅब असलेली संपूर्ण इमारत जैविक कचऱ्यामुळे (बायोवेस्ट) मिनि डम्पिंग यार्डमध्ये रुपांतरित झाली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका जसजसा वाढतो आहे तसतसे खाजगी रुग्णालये, डॉक्टर्स आणि पॅथोलॉजी लॅब्सला शासकीय रुग्णालयांसोबतच चाचणी आणि उपचारासाठीची परवानगी देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शासकीय रुग्णालये व पॅथेलॉजी लॅब्समध्ये होत असलेली गर्दी बघून सर्वसामान्य नागरिक तपासणी व उपचारासाठी खाजगीकडे वळत आहेत. ही खाजगी रुग्णालये व लॅब्स नागरिकांकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा ज्यादा शुल्क वसूल करत तर आहेतच. शिवाय, याच नागरिकांचा जीवही धोक्यात टाकत असल्याचा खळबळजनक प्रकारही पुढे येत आहे. उदारणादाखल रामदासपेठेतील ध्रुव पॅथेलॉजी लॅबद्वारे त्या संपूर्ण इमारतीला वेठीस धरण्यात येत असल्याचे चित्र आहे.
या लॅबमध्ये कोरोना संदर्भातील तपासणीसाठी प्रचंड गर्दी उसळलेली असते. टेस्ट झाल्यानंतर निघणारा जैविक कचरा अर्थात बायोवेस्ट लॅबपुढील गॅलरीतच टाकण्यात येतो. हा कचऱ्याचा ढिग वाढल्यामुळे शुक्रवारी तो संपूर्ण कचरा तळमजल्यावर टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा सगळा कचरा सर्वसामान्यांच्या वापरासाठी असलेल्या लिफ्टमधूनच आणला जातो. यात मुख्य बाब अशी की जेव्हा कचरा आणला जात होता, त्याचवेळी अनेक रुग्ण व तपासणीसाठी येणारे नागरिक त्याच लिफ्टचा वापर करत होते. अशा वेळी लॅबच्या कर्मचाऱ्यांकडून निर्जुंतुकीकरणाची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.
लॅबच्या खालच्या मजल्यावरच अवधूत नेत्रालय असल्याने या इमारतीत कोरोना तपासणी व इतर तपासणीच्या कामासोबतच नेत्रतपासणीसाठी येणाºया रुग्णांची संख्याही मोठी आहे. हे रुग्ण आपल्या वेळेसाठी दिवसभर रांगेत उभे असतात. त्यांच्या नजिकच हा बायोवेस्टचा ढिग पडलेला असतो. हा सगळा कचरा प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये बंद केला जातो. मात्र, हे पॉलिथिनही अधामधातून फाटलेले असतात. अशा स्थितीत वाºयाच्या वेगासोबतच संक्रमणाचा वेगही वाढण्याची शक्यता असते. या सगळ्याबाबत लॅबकडून दुर्लक्ष केले जात आहे आणि येणाºया रुग्णांचे जीव धोक्यात घातले जात आहे.
घरी जाऊन टेस्टिंगची सुविधा
लॅबकडून नागरिकांच्या इच्छेनुसार घरीजाऊन कोरोना तपासणीची सुविधा दिली जात आहे. परत येताना बायोवेस्टही सोबतच असते. अशा स्थितीत लॅबमध्ये येणाºयांसाठी कोरोना घेऊन आणल्याचा हा प्रकार आहे.
बायोवेस्ट डिमोलायझेशनची व्यवस्थाच नाही
खरे तर हा सगळा बायोवेस्ट नष्ट करण्यासाठी किंवा त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची विशिष्ट पद्धत आहे. मात्र, त्यासंदर्भात निष्काळजीपणा दिसून येत आहे. महापालिकेकडून या संदर्भात कठोर धोरण अवलंबणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.