कंट्रोलरच्या माध्यमातून पथदिव्यांचे नियंत्रण
By admin | Published: October 1, 2015 03:24 AM2015-10-01T03:24:48+5:302015-10-01T03:24:48+5:30
स्मार्ट सिटीच्या दिशेने नागपूर शहराची वाटचाल सुरू असतानाच ऊर्जा बचतीसाठी महापालिका शहरातील रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्याचा अभिनव उपक्रम राबवित आहे.
विद्युत विभागाचा उपक्रम : १ लाख २७ हजार
एलईडी दिवे बसविणार
नागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने नागपूर शहराची वाटचाल सुरू असतानाच ऊर्जा बचतीसाठी महापालिका शहरातील रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्याचा अभिनव उपक्रम राबवित आहे. शहरात १ लाख २७ हजार एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. या दिव्यांचे ‘कंट्रोलर विथ फिडबॅक’ या अत्याधुनिक उपकरणाच्या माध्यमातून नियंत्रण करण्यात येणार जाणार आहे.
ऊर्जा बचत व्हावी यासाठी विद्युत विभागाने शहरात २७ हजार एलईडी दिवे लावण्याचे काम हाती घेतले आहे. यापैकी ७०० दिवे लावण्यात आले आहेत. या दिव्यांचे नवीन यंत्रणेच्या माध्यमातून नियंत्रण केले जात आहे. यात पथदिव्यांचे सर्किट असलेल्या ठिकाणी चीप बसवून त्यात डाटा संग्रहित होणार आहे. त्यामुळे एखाद्या मार्गावरील दिवा बंद पडल्यास त्याची माहिती कंट्रोलरच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम सोपे होणार आहे. महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत पहिल्या टप्प्यात शहरात दीड वर्षात २७ हजार खांबांवर एलईडी दिवे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील ७०० एलईडी दिवे लावण्यात आले असून काम प्रगतिपथावर आहे.
लवकरच एक लाख एलईडी लावण्याची निविदा विभागामार्फत काढली जाणार आहे. २५० वॅट सोडियम वेपर दिव्यांच्या जागी १५० वॅट क्षमतेचे एलईडी लावण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत होत आहे. सोबतच या दिव्यामुळे अधिक प्रकाश मिळत आहे. मनपाने जे. के. सोल्युशनशी शहरात एलईडी दिवे लावण्याचा १८ मे २०१४ रोजी करार करून कंत्राट दिले आहे. कंत्राटदाराला १८ महिन्यांत हे काम पूर्ण करावयाचे आहे. (प्रतिनिधी)