स्लॅब कोसळून रुग्ण व नातेवाईकाचा मृत्यू; जीर्ण स्लॅबकडे बांधकाम विभागाचे झाले होते दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 09:31 PM2019-12-12T21:31:25+5:302019-12-12T21:31:52+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळल्याने एका वयोवृद्ध रुग्णाचा व एका महिला रुग्णाच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला.
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळल्याने एका वयोवृद्ध रुग्णाचा व एका महिला रुग्णाच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना सकाळच्या सुमारास झाली असती तर मोठी जीवितहानी झाली असती, असेही बोलले जात आहे.
देवनाथ रामचंद्र बागडे (६६) रा. पंचशीलनगर, सावनेर व वनिता वाघमारे (३५) रा. भांडेवाडी अशी मृतांची नावे आहेत. मेडिकलच्या मुख्य इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या त्वचा रोग विभागाच्या या इमारतीत महिला आणि पुरुषांचे २०-२० खाटांचे दोन स्वतंत्र वॉर्ड आहेत. घटनेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी, १७ पुरुष व १२ महिला रुग्ण वॉर्डात उपचार घेत होते. प्राप्त माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वॉर्डात भरती असलेल्या जयमाला राजकुमार दहिवले (४०) यांना एक्स-रे काढण्यासाठी मेडिकलला पाठविण्यात आले. त्यांच्या नातेवाईक वनिता वाघमारे या वॉर्डात थांबून होत्या. सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास त्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या होत्या.
Maharashtra: One man dead, one woman injured after getting trapped under a slab which collapsed at the dermatology department of Nagpur's Government Hospital today. More details awaited. pic.twitter.com/Ajq3S3J3wY
— ANI (@ANI) December 12, 2019
याचवेळी वॉर्डात भरती असलेले देवनाथ बागडे हे वयोवृद्ध रुग्ण याच ठिकाणी उभे होते. याचवेळी अचानक मोठा आवाज होऊन त्यांच्यावर स्लॅब कोसळली. वॉर्डातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका धावत बाहेर आले. तातडीने याची माहिती उपस्थित डॉक्टरांनी अग्निशमन दलाला दिली. परंतु ते पोहचण्यापूर्वी स्लॅबखाली अर्धवट अवस्थेत दबलेल्या वनिता वाघमारे या महिलेला काढण्याचा लोकांनी प्रयत्न सुरू केला. महिलेला बाहेर काढले तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती. तिला तातडीने ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. परंतु उपचार मिळण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
याचदरम्यान बांधकाम विभागाचे जेसीबी वाहन घटनास्थळी दाखल झाले. वाहनाने स्लॅब उचलली तेव्हा त्याखाली देवनाथ बागडे यांचा मृतदेहच आढळून आला. या घटनेने भरती रुग्ण व नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती होताच अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, त्वचा रोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जयेश मुखी, मेट्रन मालती डोंगरे, बांधकाम विभागाचे जयस्वाल यांनी धाव घेतली. डॉ. मित्रा यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.