औषधींचा तुटवडा पाचवीलाच पुजलेला, कापसाचा बोळाही नाही रक्त पुसायला; मेडिकलची दैना
By सुमेध वाघमार | Published: December 14, 2022 02:02 PM2022-12-14T14:02:09+5:302022-12-14T14:07:33+5:30
लसींची वेळेवरच खरेदी, रुग्णसेवा प्रभावित
नागपूर : गरिबांसाठी आशेचे किरण असलेल्या मेडिकलमध्ये पैसे असतील तरच उपचार, अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात रक्त पुसण्यासाठी मेडिकेटेड कॉटनचा तुटवडा आहे. या शिवाय, डिस्पोजल इंजेक्शन, १७ जीवरक्षक इंजेक्शन, सहा प्रकारच्या सलाइन एवढेच नव्हे तर ‘बेटॅडिन लोशन’ नाही. गरज पडल्यास वेळेवर औषधी खरेदी करण्याची वेळ येते. यातही दर दिवशी पाच हजारांवर खरेदी करता येत नसल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे.
कोरोना महामारीत शासकीय रुग्णालयांची विदारक स्थिती समोर आली. रुग्णालयातील समस्यांना प्राधान्य देण्याच्या घोषणा झाल्या. यामुळे कोरोनानंतर रुग्णालयात किमान औषधांचा तुटवडा निकाली निघेल, अशी अपेक्षा होती; परंतु, कुठलाही बदल झाला नसल्याचे चित्र आहे. मेडिकलमध्ये मागील सहा ते सात महिन्यांपासून विविध औषधी, इंजेक्शन व इतर साहित्याचा तुटवडा पडला आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या पाचमधून केवळ एक किंवा दोन औषधी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.
- वर्षाला १० कोटी मिळूनही औषधांचा ठणठणाट
मेडिकलचा १,४०१ खाटांना मंजुरी प्राप्त आहे; परंतु, रुग्णांची संख्या पाहता २,२०० खाटांची सोय करावी लागते. येथील रुग्णांच्या औषधीसाठी दरवर्षी १० कोटी मिळतात. यातील ९० टक्के निधी औषधे व साहित्य खरेदीची जबाबदारी असलेल्या ‘हाफकिन बायो- फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’कडे वळता करावा लागतो. मेडिकल प्रशासनाने हा निधी देऊनही औषधांचा ठणठणाट पडला आहे.
-१० टक्केच खरेदीचे अधिकार
औषधांचा खरेदीसाठी मिळालेल्या निधीमधून १० टक्केच खरेदीचे अधिकार मेडिकल प्रशासनाला आहे. यामुळे औषधींवर पाच हजार तर इतर साधनसामग्रीवर पाच हजार रुपयेच खरेदी करता येत असल्याने रुग्णालय अडचणीत सापडले आहे.
- हे इंजेक्शनच नाही!
ॲट्राकुरीम, एड्रेनालाइन, मिडाझोलम, पँटॉप, क्लॅम्पोस, क्लिंडा, ॲट्रोपिन १०० मि.ली., एनटीजी, डोपामाइन, एझी, ॲमिदारोन, कॅल ग्लुकोनेट, केसील, हेपेन ५००० आययु, डेक्सम, व्हॅसोप्रेसिन, डॉक्सी आदी इंजेक्शनचा तुटवडा आहे. या इंजेक्शनची गरज पडल्यास मेडिकल प्रशासन खासगी औषधी दुकानातून खरेदी करतात; परंतु, त्यापूर्वीच पाच हजारांची खरेदी झाली असल्यास त्या दिवशी खरेदी करता येत नाही. रुग्णाला ती स्वत: खरेदी करावी लागतात.
- स्थानिक पातळीवर कॉटनची खरेदी
मेडिकल प्रशासनाने स्थानिक पातळीवर मेडिकेटेड कॉटनची खरेदी केली आहे. याचा साठा उद्या बुधवारी येण्याची शक्यता आहे. जी औषधी किंवा इंजेक्शन नाहीत ते खरेदी करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत; परंतु, दरदिवशी पाच हजारांवर खरेदी करता येत नाही. ‘हाफकिन’कडून औषधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
- डॉ. शरद कुचेवार, वैद्यकीय अधीक्षक मेडिकल