जगण्याच्या उमेदीने दोन प्रकारच्या कॅन्सरवर मात; आफ्रिकन वृद्धावर नागपुरात यशस्वी ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 11:18 AM2022-09-14T11:18:25+5:302022-09-14T11:34:38+5:30
बोत्सवानामध्ये या उपचाराचे तज्ज्ञ नाहीत. यामुळे त्यांनी भारतात प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला.
नागपूर : जगण्याच्या उमेदीने व कॅन्सरला हरविण्याच्या जिद्दीने ६८ वर्षीय वृद्धाने या गंभीर आजारावर एकदा नाही तर दोनदा मात केली. विशेष म्हणजे, आफ्रिका येथील बोत्सवाना येथे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ (बीएमटी) तज्ज्ञ नसल्याने त्यांनी हजारो किलोमीटर कापून नागपुरात येऊन यशस्वी उपचार घेतले आणि ‘कॅन्सर’ला ‘कॅन्सल’ केले.
बोत्सवाना येथील ६८ वर्षीय या वृद्धाला २००७ मध्ये मुखाचा कर्करोग (स्क्वॅमस सेल कार्सिनोमा) झाला. या कॅन्सरवर बोत्सवानामध्ये शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि केमोथेरपी झाली. यातून बाहेर पडत नाही तोच २०२०मध्ये रक्ताच्या कर्करोगाचे (मल्टिपल मायलोमा) निदान झाले. यावर तिथे केमोथेरपीने उपचार झाले. परंतु आजार नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’चा सल्ला दिला.
बोत्सवानामध्ये या उपचाराचे तज्ज्ञ नाहीत. यामुळे त्यांनी भारतात प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. मेडिकल हब होऊ पाहत असलेल्या नागपूरची त्यांनी निवड केली. येथील एका खासगी रुग्णालयात हेमॅटो-ऑन्कॉलॉजी डॉ. गुंजन लोणे आणि डॉ. विश्वदीप खुशू यांची भेट घेतली. त्यांच्याकडून यशस्वी ‘ऑटोलॉगस बोन मॅरो प्रत्यारोपण’ करून घेतले.
- प्रत्यारोपणाच्या १२ दिवसांत रुग्ण बरा
डॉ. लोणे म्हणाल्या, रुग्णाला केमोथेरपीचा उच्च डोस देण्यात आला. ज्यामुळे त्यांच्या सामान्य बोन मॅरो आणि बाकी सूक्ष्म कर्करोगाच्या पेशी नष्ट झाल्या. स्वत:च्या ‘स्टेमसेल’चा वापर केल्याने उपचारात मदत झाली. प्रत्यारोपणाच्या १२ दिवसांत ते बरे झाले. तोंडाच्या कर्करोगावरील त्यांच्या पूर्वीच्या केमोथेरपी आणि वृद्धापकाळ यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता होती. परंतु गुंतागुंत टाळत ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ची प्रक्रिया यशस्वीरीत्या केली.
- रक्ताच्या विकारावर ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ हाच पर्याय
मायलोमा, लिम्फोमा, ल्युकेमिया, अप्लास्टिक ॲनिमिया, थॅलेसेमिया आणि सिकल सेल यासह अनेक रक्तविकारांवर ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ हाच पर्याय आहे. यात जंतूमुक्त वातावरणात रुग्णाची काळजी घेण्यासाठी सांघिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही डॉ. लोणे म्हणाल्या.