रुग्ण ओलीस प्रकरण : बहिणीच्या मृत्यूनंतरही दिली नाही सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:46 AM2020-08-27T00:46:50+5:302020-08-27T00:48:39+5:30
पैशासाठी खासगी रुग्णालयाने सुरेश भरडभुंजे या ज्येष्ठ व्यक्तीला ओलीस ठेवले आहे. बहिणीचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांना सुटी दिली नाही. भरडभुंजे यांचा मुलगा व कुटुंब बुधवारपासून सुटी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मनपा अधिकाऱ्यांकडून त्यांना आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पैशासाठी खासगी रुग्णालयाने सुरेश भरडभुंजे या ज्येष्ठ व्यक्तीला ओलीस ठेवले आहे. बहिणीचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांना सुटी दिली नाही. भरडभुंजे यांचा मुलगा व कुटुंब बुधवारपासून सुटी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मनपा अधिकाऱ्यांकडून त्यांना आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.
६२ वर्षीय भरडभुंजे हे १० ऑगस्ट रोजी बजाजनगर येथील एका खासगी रुग्णालयात भरती झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधार झाल्यामुळे ते १० दिवसांपासून रुग्णालयाला सुटी मागत होते. त्यांनी रुग्णालयाचे १.६५ लाख रुपये शुल्क भरले. परंतु रुग्णालयाने त्यांना आणखी १.६० लाख रुपये जमा करण्यास सांगितले. हे प्रकरण पोलीस व मनपा अधिकाऱ्यांपर्यंत पोहचले. भरडभुंजे यांनी अनेकदा पोलीस कंट्रोलला फोन करून समस्या सांगितली. बजाजनगर पोलिसांकडूनही काहीच मदत मिळाली नाही. मनपा आयुक्तांनाही तक्रार केली. पण कुठूनच मदत मिळत नसल्याने, लोकमतकडे त्यांनी तक्रार केली. लोकमतने हे प्रकरण उजेडात आणताच मनपा प्रशासन सतर्क झाले. त्यांनी चौकशी सुरू केली आहे. परंतु रुग्णालयाच्या दबावामुळे मनपा अधिकाऱ्यांनी कुठलीही ठोस कारवाई केली नाही. मनपा अधिकारी स्वत:ला संक्रमित असल्याचे सांगून कारवाईपासून हात झटकत आहेत.
दरम्यान, बुधवारी सकाळी भरडभुंजे यांच्या बहिणीचा मृत्यू झाला. तीसुद्धा कोरोना संक्रमित असल्याने कामठी रोडवरील एका खासगी रुग्णालयात भरती होती. भरडभुंजे यांनी मनपा अधिकारी व रुग्णालय प्रशासनाला सुटी देण्यास विनंती केली. त्यावर त्यांना ५० हजार रुपये तात्काळ जमा करण्यास सांगितले व उरलेले ५० हजार देण्यासाठी स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यास सांगितले. भरडभुंजे त्यासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे रुग्णालयाने त्यांना सुटी देण्यास मनाई केली. कोरोना संक्रमणामुळे लोक दहशतीत आहेत. गेल्या दोन दिवसात किमान १०० लोकांचा जीव गेला आहे. यात युवकांचाही समावेश आहे. अशात खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची होत असलेली पिळवणूक आश्चर्यकारक आहे. भरडभुंजे यांचे कुटुंब दु:खात आहे. भरडभुंजे ज्या रुग्णालयात आहेत, तेथील अन्य रुग्णांनीही लोकमतला संपर्क साधून रुग्णालयाकडून वसुली जोरात सुरू असल्याची तक्रार केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, डॉक्टरांचे संघटनसुद्धा रुग्णांची व्यथा ऐकून घेण्यास तयार नाही. यासंदर्भात मनपाचे अप्पर आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले की प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात तथ्य आढळल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल.