शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयातील रुग्ण उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:11 AM2021-08-20T04:11:20+5:302021-08-20T04:11:20+5:30
नागपूर : सक्करदरा चौक येथील शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना जानेवारीपासून उपाशी ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. यामागे ...
नागपूर : सक्करदरा चौक येथील शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना जानेवारीपासून उपाशी ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. यामागे सुरुवातीला कोरोनामुळे रुग्णच भरती नसल्याचे व नंतर स्वयंपाकघराच्या डागडुजीमध्ये वेळ गेल्याने भोजन देता आले नसल्याचे कारण, रुग्णालय प्रशासनाने पुढे केले आहे.
शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात १८० खाटा आहेत. काय चिकित्सा, रोग निदान, शल्य, चालाक्य, प्रसूती तंत्र, स्त्री रोग व पंचकर्म असे सात विभाग आहेत. शालाक्य विभागांतर्गत नेत्र रोग, मुख रोग, कान, नाक व घशाचे रोगाचे रुग्ण, शल्य विभागात संसर्गजन्यसह इतरही आजाराचे रुग्ण व शल्य विभागांतर्गत विविध शस्त्रक्रियाचा रुग्णांना भरती केले जातात. रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असतानाही स्थापनेपासून खाटांची संख्या वाढलेली नाही. भरती असलेल्या गरीब रुग्णांचे पोषण होऊन औषधोपचारात मदत व्हावी यासाठी सकाळचा नाश्त्यासह सकाळ व सायंकाळचे भोजन देण्याचे नियम आहे. परंतु या रुग्णालयात मागील सात महिन्यांपासून रुग्णांना भोजनापासून वंचित ठेवण्यात आले. या संदर्भात शिवसेनेचे शिष्टमंडळ चंदु राऊत व सुरज गोजे यांच्या नेतृत्वात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुभाष राऊत यांना भेटून या विषयी तक्रार दाखल केली आहे. चंदु राऊत यांच्या नुसार, किचन बंद असल्याचे कारण दिले जात असलेतरी रुग्णांना पॅकेटबंद जेवण देणे शक्य होते. परंतु त्याकडेही डॉ. राऊत यांनी दुर्लक्ष केले. रुग्णांना जेवणापासून वंचित ठेवण्याचा या प्रकाराची पोलिसातही तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-स्वयंपाकघराची डागडुजीमुळे भोजन देता आले नाही
कोरोनाचा दुसऱ्या लाटेत रुग्णालयात रुग्णांची संख्या कमी झाली. त्यात एकही रुग्ण भरती नव्हता. या दरम्यान स्वयंपाक घराची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविला. त्यांनी दुरुस्तीसाठी पाच महिन्यावर कालावधी लावला. यामुळे रुग्णांना भोजन देता आले नाही. परंतु १४ ऑगस्टपासून पुन्हा भोजन देणे सुरू केले आहे.
-डॉ. सुभाष राऊत, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय