‘सुपर’मधील रुग्णाची ऑक्सिजनसाठी मेडिकलला धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 12:27 PM2021-02-26T12:27:45+5:302021-02-26T12:28:09+5:30
Nagpur News मेडिकलमधून ‘सुपर’मध्ये ‘इको’ करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या एका रुग्णाचे ऑक्सिजन सिलिंडर संपले. रुग्णासोबत असलेल्या डॉक्टरने तेथील परिचारिकांना सिलिंडरची मागणी केली. परंतु उपलब्ध असतानाही त्यांनी देण्यास थेट नकार दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना काळात ऑक्सिजन सिलिंडरचे महत्त्व सर्वांनाच कळले असताना, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना याचे महत्त्व नसावे, याचे नवलच. परंतु गुरुवारी तसेच झाले. मेडिकलमधून ‘सुपर’मध्ये ‘इको’ करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या एका रुग्णाचे ऑक्सिजन सिलिंडर संपले. रुग्णासोबत असलेल्या डॉक्टरने तेथील परिचारिकांना सिलिंडरची मागणी केली. परंतु उपलब्ध असतानाही त्यांनी देण्यास थेट नकार दिला. रुग्ण अस्वस्थ होत असल्याचे पाहत त्या डॉक्टरने मेडिकलच्या एका निवासी डॉक्टरना फोन करून याची माहिती दिली. मेडिकलच्या त्या डॉक्टरने तातडीने आपल्या दुचाकीवरून दुसरे सिलिंडर आणल्याने त्या रुग्णाचा जीव वाचला.
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वरिष्ठांचा वचक नाही. यामुळे मन मानेल तसा कारभार सुरू आहे. परिणामी, याचा फटका सामान्य व गरीब रुग्णांना बसत आहे. विशेष म्हणजे, रुग्णांना सोयीचे व्हावे म्हणून मुख्य द्वाराजवळ स्वागत कक्ष तयार करण्यात आला. परंतु तिथे कोणीच राहत नाही. धक्कादायक म्हणजे, व्हीलचेअर आणि स्ट्रेचर मिळण्यासाठी आधारकार्ड जमा करावे लागते. रुग्ण स्ट्रेचर आणून देत नाही, हे कारण सांगितले जाते. यावरून रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ढकलावे लागते हे सिद्ध होते. परंतु त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. गुरुवारच्या ‘त्या’ घटनेत ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाला असता तर जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
झाले असे की, मेडिकलच्या किडनी युनिटमध्ये वर्धा येथील एक २० वर्षीय तरुणी भरती आहे. ती ऑक्सिजनवर आहे. तिला हृद्यविकाराची समस्या आहे का, हे पाहण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘इको’ करण्यास पाठविले. मेडिकलमधून सुपर’ला घेऊन जाताना सोबत ऑक्सिजन सिलिंडर दिले. तिच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी एका कनिष्ठ महिला डॉक्टरलाही पाठविले. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान तिचा ‘इको’ झाला. अहवालासाठी ते थांबले असताना, अचानक ऑक्सिजन संपले. त्या महिला डॉक्टरने धावत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या परिचारिका कक्षात धाव घेतली. तिथे ऑक्सिजन सिलिंडर ठेवले होते. महिला डॉक्टरने रुग्णाची स्थिती सांगत सिलिंडरची मागणी केली. परंतु तेथील परिचारिकेने चक्क नकार दिला. इकडे रुग्ण ऑक्सिजनअभावी अस्वस्थ झाला होता. यामुळे महिला डॉक्टरने मेडिकलमध्ये कार्यरत एका निवासी डॉक्टरला फोन करून याची माहिती दिली. त्या डॉक्टरने तत्परता दाखवित आपल्या दुचाकीवर ऑक्सिजन सिलिंडर ठेवून ‘सुपर’ गाठले. रुग्णाला तातडीने ऑक्सिजन मिळाल्याने पुढील धोका टळला. परंतु या घटनेने ‘सुपर’मधील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा सामोर आला.
झालेला प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसा अहवाल अधिष्ठाता यांच्याकडे पाठविला जाईल. पुढे असे होणार नाही, याकडे लक्ष दिले जाईल.
- डॉ. मिलिंद फुलपाटील
विशेष कार्य. अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल