कोरोनापुढे इतर आजारांचे रुग्ण व डॉक्टर्स झाले हतबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:37+5:302021-04-26T04:07:37+5:30

- सगळेच हॉस्पिटल ८० टक्के संक्रमितांनी फुल्ल - इतर आजारांसाठी व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, आयसीयूंचा तुटवडा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

Patients and doctors of other diseases became helpless before Corona! | कोरोनापुढे इतर आजारांचे रुग्ण व डॉक्टर्स झाले हतबल!

कोरोनापुढे इतर आजारांचे रुग्ण व डॉक्टर्स झाले हतबल!

Next

- सगळेच हॉस्पिटल ८० टक्के संक्रमितांनी फुल्ल

- इतर आजारांसाठी व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, आयसीयूंचा तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत मनपाने सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के खाटा संक्रमितांसाठी आरक्षित केल्या आहेत. केवळ २० टक्के खाटा इतर आजारांसाठी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचा परिणाम इतर आजारांचे रुग्ण भीतीपोटी रुग्णालयांकडे वळत नाहीत. आजारामुळे शरीरातील कॉम्प्लिकेशन्स वाढल्यावर ते रुग्णालयांचा रस्ता धरतात. मात्र, तोवर उशीर झालेला असतो, अशी स्थिती आहे. सोबतच व्हेंटिलेटर्स व आयसीयू कोरोना संक्रमितांना समर्पित केले असल्यामुळे, इतर आजारांच्या शस्त्रक्रियांना अडथळा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन सिलेंडर्सचा तुटवडाही इतर रुग्णांना भोगावा लागत आहे.

------------पॉईंटर्स

शहरातील शासकीय-निमशासकीय रुग्णालये

- ४४

कोविडवर उपचार सुरू असलेले शासकीय रुग्णालये

- १०

कोविडवर उपचार सुरू असलेले खासगी रुग्णालये

- १४२

----------------

रुग्णांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू केल्या

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांसह डॉक्टरांनाही संसर्गाची प्रचंड धास्ती होती. त्यामुळे अनेकांनी ट्रीटमेंट घेणे टाळले. अनेकांनी घरच्या घरी उपचार घेतले. कर्करोगाची लक्षणे उशिराने दिसत असल्याने अनेकांनी दुर्लक्ष केले. एप्रिलमध्ये टेस्ट केलेले रुग्ण त्रास वाढल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबमध्ये येत होते. त्यात अनेकांचा मृत्यूही झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली असल्याने आता रुग्ण उपचाराला प्राधान्य देत आहेत. बरेच रुग्ण मध्य प्रदेश, छत्तीसगढ, विदर्भाच्या जिल्ह्यांतून येतात. त्यांना किमोसाठीचा त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांत ओपीडी सुरू केली आहे. अनेक हॉस्पिटल्स कोविड सेंटरमध्ये कन्व्हर्ट झाली असली तरी कर्करोगासारख्या आजारासाठी वेगळी दालने सुरू ठेवण्यात आली आहेत.

- डॉ. आशिष भांगे, कर्करोग विशेषज्ञ, एससीजी कॅन्सर हॉस्पिटल

--------------

आपली पिढी अनुभवत असलेली सर्वात विदारक स्थिती

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ताण कमी झाला, प्रदूषण कमी झाले म्हणून रुग्णांची संख्या घटली असा भ्रम निर्माण झाला होता. मात्र, नॉन कोविड रुग्णांमध्ये त्यांच्या पूर्ववत आजारांचे कॉम्प्लिकेशन्स वाढल्यानंतर ते यायला लागले. नेमकी तशीच स्थिती दुसऱ्या लाटेतही दिसून येत आहे. सर्व खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत, तर २० टक्के रुग्ण नॉनकोविडसाठी आहेत. याचा परिणाम व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, आयसीयू या सगळ्या आपत्कालीन यंत्रणा कोरोना रुग्णांना समर्पित आहेत. अशा स्थितीत कर्करोग, हृदयरोग व इतर आजार असलेल्या रुग्णांची निश्चितच हयगय होत आहे. अनेक बायपास, सर्जरी टाळाव्या लागत आहेत. ही अत्यंत विदारक स्थिती आपली पिढी अनुभवते आहे आणि यासाठी कोणीच तयार नव्हते किंवा अशी तयारी कधीच करता येऊ शकत नाही.

- डॉ. पंकज हर्कुट, हृदयरोगतज्ज्ञ, स्वस्थम सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल

............

जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये कोविडचे उपचार

शहरात वेगवेगळ्या आजारांना समर्पित बरेच हॉस्पिटल्स आहेत. जसे बालरोग, स्त्रीरोग, कर्करोग आदी. या हॉस्पिटल्सना आतापर्यंत कोरोना संक्रमित रुग्णांची परवानगी नव्हती. मात्र, संक्रमणाचा वेग जसजसा वाढतो आहे तसतसे हे हॉस्पिटल्सही कोविड रुग्णांसाठी नेमले जात असल्याचे चित्र आहे. प्रत्येक हॉस्पिटलला ८० टक्के खाटा कोविड रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत.

--------------

संक्रमणाच्या भीतीपोटी रुग्णच येत नाहीत!

कोरोना संक्रमणाच्या भीतीपोटी इतर आजारांचे रुग्ण हॉस्पिटल्सकडे येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, हॉस्पिटल्सचे डॉक्टर दूरध्वनीवरून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून रुग्णांशी संवाद साधत आहेत. काही मोठ्या हॉस्पिटल्सनी रुग्णांची ही गैरसोय टाळण्यासाठी व त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार वेगवेगळ्या जिल्ह्यांत स्वतंत्र ओपीडी सुरू केल्या आहेत. कॉम्प्लिकेशन वाढलेल्या रुग्णांनाच हॉस्पिटल्समध्ये बोलावले जात आहे. व्हेंटिलेटर्स, आयसीयू, ऑक्सिजनची उपलब्धता यानुसार शस्त्रक्रिया ठरविल्या जात आहेत. अनेकांच्या सर्जरी रद्द करण्याची वेळ येत आहे.

..................

Web Title: Patients and doctors of other diseases became helpless before Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.