नागपुरातील हनुमाननगर, धरमपेठ व लक्ष्मीनगर झोनमध्ये वाढताहेत रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 09:12 PM2020-09-10T21:12:15+5:302020-09-10T21:13:37+5:30
कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात सर्वाधिक रुग्णांची नोंद महानगरपालिकेच्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये होत होती, परंतु आता दहाही झोनमध्ये कमीअधिक प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात सर्वाधिक रुग्णांची नोंद महानगरपालिकेच्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये होत होती, परंतु आता दहाही झोनमध्ये कमीअधिक प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या काळात म्हाळगीनगर, हनुमाननगर, धरमपेठ व लक्ष्मीनगर झोनअंतर्गत नव्या वसाहतींभोवती कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होऊ पाहत आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सप्टेंबर महिन्यात तर रुग्णसंख्येसोबतच मृत्यूंच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. यात रोज नवे विक्रम होत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेषत: मृत्यूसंख्येच्या भयावह आकडेवारीने चिंतेचे वातावरण आणखी गडद झाले आहे. शहरात पहिल्या रुग्णाची नोंद मार्च महिन्यात झाली. हा रुग्ण लक्ष्मीनगर झोनअंतर्गत बजाजनगर वसाहतीतील होता. परंतु एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान सर्वाधिक रुग्ण हे झोन क्र. ७ सतरंजीपुरा व व झोन क्र. ६ गांधीबाग झोन अंतर्गत वसाहतीतून आढळून आले. जुलै व ऑगस्ट महिन्यात मात्र सर्वच झोनमधून रुग्णांची नोंद होऊ लागली. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीतील पाच दिवसांच्या रुग्णांची झोननिहाय यादीनुसार म्हाळगीनगर, हनुमाननगर, धरमपेठ व लक्ष्मीनगरमध्ये सर्वाधिक रुग्ण दिसून आले.
म्हाळगीनगर झोनमध्ये सर्वाधिक रुग्ण
जिल्हा माहिती कार्यालयातून उपलब्ध माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद म्हाळगीनगर झोनमध्ये झाली आहे. ३१ ऑगस्ट रोजी १५६, २ सप्टेंबर रोजी ८८, ३ सप्टेंबर रोजी १३२ तर ५ सप्टेंबर रोजी १८४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ९ सप्टेंबरच्या नोंदीमध्ये ७० रुग्णांची नोंद आहे.
हनुमाननगर झोन दुसऱ्या क्रमांकावर
मनपा झोनमध्ये हनुमाननगर झोनचा क्रमांक तिसरा असला तरी कोरोनाबाधितांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या झोनमध्ये ३१ ऑगस्ट रोजी ५५, २ सप्टेंबर रोजी ७८, ३ सप्टेंबर रोजी १०८ तर ५ सप्टेंबर रोजी ९९ तर ९ सप्टेंबर रोजी ९४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मंगळवारी झोननंतर सर्वाधिक रुग्ण याच झोनमध्ये दिसून आले.
धरमपेठ व लक्ष्मीनगर झोनमध्येही रुग्णांची वाढ
इतर झोनच्या तुलनेत म्हाळगीनगर, हनुमाननगर, धरमपेठ व लक्ष्मीनगर झोनअंतर्गत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील संशयित रुग्णांचे ट्रेसिंग चांगल्या पद्धतीने होत असल्याने किंवा स्वत:हून रुग्ण चाचणीसाठी पुढाकार घेत असल्यानेही रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. ९ सप्टेंबरच्या यादीनुसार धरमपेठ झोनमध्ये ८६ तर लक्ष्मीनगर झोनमध्ये ८७ रुग्णांची नोंद झाली. इतर झोनमध्ये ७० ते ६० दरम्यान रुग्णसंख्या होती.
९ सप्टेंबर रोजी झोननिहाय पॉझिटिव्ह आलेले रुग्ण
लक्ष्मीनगर (क्र. १) ८७
धरमपेठ (क्र. २) ८६
हनुमाननगर (क्र. ३) ९४
धंतोली (क्र. ४) ६०
नेहरूनगर (क्र. ५) ५६
गांधीबाग (क्र. ६) ३५
सतरंजीपुरा (क्र. ७) ०९
लकडगंज (क्र. ८) ४३
आशीनगर (क्र. ९) ७०
महागाळगीनगर (क्र. १०) ७०