घाणीच्या विळख्याने रुग्ण धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:13 AM2021-09-15T04:13:14+5:302021-09-15T04:13:14+5:30
नागपूर : स्वच्छ वातावरण असले की, पन्नास टक्के संसर्ग आजार दूर ठेवता येतात; परंतु तसे चित्र मेयोमध्ये दिसत ...
नागपूर : स्वच्छ वातावरण असले की, पन्नास टक्के संसर्ग आजार दूर ठेवता येतात; परंतु तसे चित्र मेयोमध्ये दिसत नाही. अस्वच्छता जणू काही या रुग्णालयातील गळ्यातील दागिनाच बनला आहे. धक्कादायक म्हणजे, ८८४ बेड असलेल्या या रुग्णालयाची जबाबदारी केवळ ६० कर्मचाऱ्यांवर असल्याने जागोजागी अस्वच्छता व कचऱ्याच्या ढिगाऱ्याने रुग्णालयच आजारी पडल्याचे चित्र आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (मेयो) सतत गर्दी, रांगा नेहमीचा भाग असलातरी, येथे येणाºयांसाठी मुलभूत सोयी उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृहातील स्वच्छता नावालाही नाही. सुरू असलेल्या युरिनलसह शौचालयाची स्थिती भयंकर आहे. तिकडे पाहू शकणार नाही, इतकी घाण त्या ठिकाणी आहे. इमारतीलगत तर कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. वॉर्डाच्या आत, बाहेर आणि पायऱ्यांवर जैविक कचऱ्यासह, खरखटे अन्न व इतर कचरा नेहमीच पडलेला असतो. वॉर्डातील वºहांड्यात ठेवलेल्या कचरापेटीची सफाई योग्य होत नसल्याने नाकाला रुमाल बांधूनच समोर जावे लागते. स्त्रीरोग व प्रसूतीच्या इमारतीत जागोजागी जैविक कचरा पडून राहत असल्याने रुग्णांसोबतच डॉक्टर, परिचारिका व कमरचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
-५९४ बेडनुसारच चतुर्थ कर्मचारी
मेयो रुग्णालयात पूर्वी बेडची संख्या ५९४ होती. नंतर सर्जिकल कॉम्प्लेक्स उभे झाल्याने ३९० बेडची भर पडली. सध्या एकूण ८८४ बेड आहेत. परंतु आजही ५९४ बेडनुसार कर्मचाऱ्यांना मंजुरी आहे. यातही १२७ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. दरम्यानच्या काळात एका याचिकेवर न्यायालयाने सर्जिकल कॉम्प्लेक्ससाठी १५७ चतुर्थ कर्मचारी देण्याचे आदेश दिले होते. परंतु या कर्मचाऱ्यांची अद्यापही भरतीही झाली नाही. सध्या ६० कर्मचाऱ्यांवर ८८४ बेडच्या रुग्णालयांच्या सफाईची जबाबदारी आहे. यामुळे अस्वच्छतेचा कळस गाठला आहे.
-एका पाळीत केवळ २० कर्मचारी
कोरोनाचा काळात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मेयोला १६५ चतुर्थ कर्मचारी मिळाले होते. यामुळे सफाईचा प्रश्न पुढे आला नव्हता. कोरोनाचे रुग्ण कमी होताच जुलै महिन्यात या सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे निर्देश होते. परंतु मेयो प्रशासनाच्या विनंतीवरून ३१ ऑगस्टपर्यंत यांची मुदत वाढविण्यात आली. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सफाई कर्मचारी न मिळाल्याने मेयो प्रशासनाने नुकतेच यातील १०५ कर्मचाऱ्यांना काढून ६० कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले आहे. एका पाळीत केवळ २० कर्मचारी काम करीत आहेत.
-वैद्यकीय शिक्षण विभागाने नाकारले आऊटसोर्सिंग
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मेयो प्रशासनाने स्वच्छतेच्या कामाचे आऊटसोर्सिंगला मंजुरी देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु विभागाने प्रस्तावच नाकारला. यामुळे रुग्णालय प्रशासन अडचणीत येऊन स्वच्छतेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. यावर कोणी वरिष्ठ अधिकारीही बोलण्यास तयार नाही.