सोशल मिडियावर वाचून रुग्ण कोरोनासाठी करताहेत विशिष्ट औषधांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:20 AM2020-07-17T11:20:20+5:302020-07-17T11:22:01+5:30

व्हॉटस्अ‍ॅप, सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर वाचून रुग्ण नेमके तेच औषध देण्यास डॉक्टरांना भंडावून सोडत आहेत.

Patients asked medicine for corona by reading on social media | सोशल मिडियावर वाचून रुग्ण कोरोनासाठी करताहेत विशिष्ट औषधांची मागणी

सोशल मिडियावर वाचून रुग्ण कोरोनासाठी करताहेत विशिष्ट औषधांची मागणी

Next
ठळक मुद्देडॉक्टरांमध्ये नाराजी रेमेडेसिवर, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, फॅविपिरावीर, टॉसिलिझुमॅब किंवा प्लाझ्मा थेरपी देण्याचा आग्रह

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हीच औषध दिल्यानंतर कोरोनाचा रुग्ण बरा होतो, असे कुणीही खात्रीलायक सांगू शकत नाही. अद्यापही विविध औषधे, प्रतिबंधक लस व थेरपीवर संशोधन सुरू आहे, असे असताना बहुसंख्य रुग्ण त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारावर विश्वास न ठेवता, व्हॉटस्अ‍ॅप, सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर वाचून नेमके तेच औषध देण्यास डॉक्टरांना भंडावून सोडत आहेत. विशेष म्हणजे, रेमेडेसिवर, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, फॅविपिरावीर, आयटोलिझुमॅब, टॉसिलिझुमॅब किंवा प्लाझ्मा थेरपी देण्याचा आग्रह रुग्ण धरीत असल्याने काही डॉक्टरांमध्ये नाराजी आहे.
विदर्भात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी बाधितांची संख्या ७,८४३ वर पोहचली तर २२४ रुग्णांचा मृत्यू झाला. या आजाराला घेऊन सर्वांच्या मनात भीती आहे. यामुळे एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास तो डॉक्टरांकडे प्रभावी औषधोपचाराची मागणी करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, कोविड हॉस्पिटल, कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटरमधील रुग्णांवर करण्यात येणाऱ्या औषधोपचाराची राज्याच्या कोरोनाविषयक कृती दलाने काही उपचारपद्धती आखून दिली आहे. त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक असणारे औषध ते किती प्रमाणात कोणत्या प्रसंगी द्यावे हे सांगण्यात आले आहे. सध्या डॉक्टर ज्या उपचारपद्धतीचा वापर करत रुग्णांना उपचार देत आहेत, त्याने नक्कीच रुग्णांना फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु त्यानंतरही रुग्ण भीतीपोटी डॉक्टरांकडे विविध औषधांची मागणी करून त्रास देत असल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

रेमेडेसिवीर : सध्या केवळ गंभीर रोग असलेल्या रुग्णालयातच याचा वापर केला जातो. हा जीव वाचवणारा म्हणून मानला जातो. महाराष्ट्र शासनाने ज्या जिल्ह्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे तेथील रुग्णालयात ही औषध उपलब्ध करून दिली आहे. परंतु लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांकडून या औषधीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. समजावून सांगिल्यानंतरही अनेकवेळा रुग्ण जीवाच्या भीतीपोटी ऐकत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

-फॅविपिरावीर : या औषधीवर नागपुरातील मेडिकलमध्ये संशोधन सुरू आहे. तोंडावाटे देण्यात येणारे हे औषध सध्या केवळ सौम्य किंवा मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना दिले जात आहे. लक्षण नसलेले रुग्णांकडून या औषधाचीही मागणी होते.

-टॉसिलिझुमॅब : ही एक लस आहे. जे रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आहेत आणि ज्यांच्या शरीरातील इतर अवयवांवर सूज आली असेल त्या रुग्णांना ही लस दिली जाते. परंतु याच्या वापरामुळे जीवाणूच्या संसर्गाची जोखीम वाढू शकते. यामुळे लस देताना डॉक्टर रुग्णाला याची माहिती देऊनच लस देतात. परंतु अलीकडे किडनी, यकृताचा आजार असलेल्या रुग्णांकडून ही लस देण्याची मागणी होत आहे.

-आयटोलिझुमॅब : ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडियाने (डीसीजीआय) या लसीला परवानगी दिली आहे. ही लस मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या व श्वसनाचा त्रास होत असलेल्या रुग्णांना आणीबाणीच्यावेळी दिले जाते. परंतु न्युमोनियाची सामान्य लक्षणे असलेले रुग्ण या औषधाची मागणी करतात.

-प्लाझ्मा थेरपी : प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या देशभर सुरू आहेत. या थेरपीचे नागपूर केंद्र ठरले आहे. परंतु, सध्या हे सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि केवळ डॉक्टरांनी मंजूर केलेल्या निवडक रुग्णांना त्यांच्या संमतीनंतर प्लाझ्मा दिले जात आहे. प्लाझ्मा ट्रायल्ससाठी मध्यम ते गंभीर मध्यम रुग्णांची निवड केली जात आहे.
 

Web Title: Patients asked medicine for corona by reading on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.