कॅज्युअल्टीमधील रुग्णांना अखेर मिळाला वॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:08 AM2021-03-27T04:08:40+5:302021-03-27T04:08:40+5:30

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सर्वाधिक भार मेडिकलवर आला आहे. खाटा उपलब्ध करून देण्याची मोहीम अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता ...

Patients in casualty finally got the ward | कॅज्युअल्टीमधील रुग्णांना अखेर मिळाला वॉर्ड

कॅज्युअल्टीमधील रुग्णांना अखेर मिळाला वॉर्ड

Next

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सर्वाधिक भार मेडिकलवर आला आहे. खाटा उपलब्ध करून देण्याची मोहीम अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी हाती घेतली आहे. शुक्रवारी वॉर्ड क्र. ४९ मधील लसीकरण केंद्र ‘डीन बंगल्यात’ स्थानांतरित करून तिथे कोरोना रुग्णांसाठी नवीन वॉर्ड तयार केला. परिणामी, मागील दोन ते तीन दिवसांपासून कॅज्युअल्टीमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना अखेर वॉर्ड मिळाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मागील मार्च महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसेवेत कार्यरत आहे. दरम्यानच्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असताना, ‘नॉन कोविड’ची रुग्णसंख्या वाढली. आता फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढत चालल्याने अख्खे रुग्णालयच ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’मध्ये रूपांतरित झाल्याचे चित्र आहे. गुरुवारी जवळपास ५७० खाटा फुल्ल झाल्याने मेडिसिन कॅज्युअल्टीमध्येच रुग्णांना उपचार केले जात होते. येथेही खाटा कमी असल्याने एका खाटावर दोन रुग्णांना ठेवण्याची वेळ मेडिकलवर आली. यातून मार्ग काढण्यासाठी, नवीन वॉर्ड उभे करण्यासाठी मागील काही दिवसांपासून अधिष्ठाता डॉ. गुप्ता, मेडिसिनचे विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, डॉ. बारसागडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कांचन वानखेडे, मेट्रन अश्विनी तायडे व इतरही वरिष्ठ डॉक्टर प्रयत्न करीत होते. यातून वॉर्ड ४९ मधील लसीकरण केंद्र रिकाम्या असलेल्या ‘डीन बंगल्यात’ स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शुक्रवारी ४० खाटांचा हा वॉर्ड रुग्णसेवेत सुरू होऊ शकला. सध्या मेडिकलमध्ये ६१० खाटा असून ५१५ रुग्ण उपचार घेत आहेत.

- खाटांची संख्या ९०० वर नेणार

सध्या मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांसाठी ६१० खाटा आहेत. या खाटा ९०० पर्यंत वाढविल्या जाणार आहेत. पुढील दोन-तीन दिवसात दोन वॉर्ड सुरू होतील. मेडिकलमधील सर्वच विषयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी जोखीम पत्करून रुग्णसेवा देत आहेत.

- डॉ. सुधीर गुप्ता

अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: Patients in casualty finally got the ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.