विदर्भात वाढले कोरोना रुग्ण; १९ दिवसात ५,०००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 10:04 AM2020-07-23T10:04:46+5:302020-07-23T10:21:06+5:30

बुधवारी विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर पोहचली. ही संख्या गाठण्यास १३२ दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, मागील १९ दिवसांत रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे.

Patients of corona raised in Vidarbha; 5,000 in 19 days | विदर्भात वाढले कोरोना रुग्ण; १९ दिवसात ५,०००

विदर्भात वाढले कोरोना रुग्ण; १९ दिवसात ५,०००

Next
ठळक मुद्दे४५६ नव्या रुग्णांची नोंद७ जणांचा मृत्यू

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात पहिला रुग्ण ११ मार्च रोजी नागपुरात आढळून आला. त्यानंतर ७० दिवसानंतर पहिल्या हजार रुग्णांची नोंद झाली. परंतु जून महिन्यात रुग्णसंख्येचा वेग वाढला. हजार रुग्ण गाठण्याचे दिवस ७० वरून १५ दिवसांवर आले. जुलै महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत गेल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
बुधवारी विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर पोहचली. ही संख्या गाठण्यास १३२ दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, मागील १९ दिवसांत रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे.
विदर्भात झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या आरोग्य यंत्रणेसमोर चिंतेची बाब ठरली आहे. आज तर रोजच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच ४४३ रुग्णांची नोंद झाली. शिवाय, सात बाधितांचे मृत्यू झाले आहेत. रुग्णांची संख्या १० हजार २५६ तर मृतांची संख्या २७९ वर पोहचली आहे. आतापर्यंत ६ हजार ७२१ रुग्ण बरे झाले असून ३ हजार २०६ रुग्ण उपचार घेत आहेत.

नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांचे शतक
नागपूर जिल्ह्यात सलग दुसºया दिवशी रुग्णांनी शंभरी गाठली. १२२ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ३,२९३ झाली आहे. २,११३ रुग्ण बरे व १,११९ रुग्ण उपचाराखाली आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातही रुग्ण वाढतच चालले आहेत. ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ८३४ झाली आहे. या जिल्ह्यात दोन मृत्यूची नोंंद झाली आहे. अकोला जिल्ह्यात ४० बाधितांचे निदान झाले. रुग्णसंख्या २,२४६ झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू तर ११ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या १२६ झाली आहे. वाशिम जिल्ह्यात १९, चंद्रपूर जिल्ह्यात १५, तर गोंदिया जिल्ह्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.

यवतमाळात एक मृत्यू, सात दिवस लॉकडाऊन
यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात यवतमाळातील इस्लामपुरा स्थित ४६ वर्षीय मोबाईल विक्रेत्याचा मृत्यू झाला. तर ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सर्वाधिक २२ जण पुसदचे तर १७ पांढरकवडा येथील आहेत. दरम्यान प्रशासनाने २५ जुलैपासून सात दिवसांसाठी यवतमाळ व पांढरकवडा शहरात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे.
अमरावती जिल्ह्यात दिवसभरात ६९ संक्रमितांची नोंद झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या १,४८५ वर पोहोचली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. बुधवारच्या अहवालात मोर्शी शहरात ११ व तालुक्यात दोन अशा १३ व्यक्तींची नोंद झाली. याव्यतिरिक्त तिवसा व परतवाडा, चांदूर बाजार व चांदूर रेल्वे तालुक्यातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.

-चंद्रपूरमध्ये शून्य मृत्यू
विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर गेली आहे, परंतु चंद्रपूर जिल्ह्यात सध्यातरी एकाही मृत्यूची नोंद नाही. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्ह्यात झाले आहेत. येथे १०४ मृत्यूची नोंद आहे. त्यानंतर नागपुरात ६३, अमरावती जिल्ह्यात ४२, बुलडाणा जिल्ह्यात २४, यवतमाळ जिल्ह्यात २३, वाशिम जिल्ह्यात नऊ, वर्धा जिल्ह्यात आठ, गोंदिया जिल्ह्यात तीन, भंडारा जिल्ह्यात दोन तर गडचिरोली जिल्ह्यात एका रुग्णाचा बळी गेला आहे.

Web Title: Patients of corona raised in Vidarbha; 5,000 in 19 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.