निवासी डॉक्टरांअभावी रुग्णांचा जीव टांगणीला
By admin | Published: April 5, 2015 02:25 AM2015-04-05T02:25:29+5:302015-04-05T02:25:29+5:30
निवासी डॉक्टर हे प्रत्येक हॉस्पिटलचा कणा असतात. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयांत (सुपर स्पेशालिटी रुग्णालय) हे पदच मंजूर नाहीत.
सुमेध वाघमारे नागपूर
निवासी डॉक्टर हे प्रत्येक हॉस्पिटलचा कणा असतात. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयांत (सुपर स्पेशालिटी रुग्णालय) हे पदच मंजूर नाहीत. परिणामी, हॉस्पिटलमधील सेवांचा बोजवारा उडाला आहे. सध्याच्या स्थितीत कनिष्ठ व वरिष्ठ असे मिळून ८६ निवासी डॉक्टरांची गरज आहे. हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर निघून गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेणारे निवासी डॉक्टरच नसल्याने गेल्या १७ वर्षांपासून हॉस्पिटलचे कामकाज प्रभावित झाले आहेत. रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ १९९८ साली तयार झाले. गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, हृदयरोग, यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी व न्यूरोसर्जरी अशा पाच विभागातून रुग्णसेवा सुरू झाली खरी, परंतु सकाळ, दुपारी आणि सायंकाळ या तीन पाळीत रुग्णांना सांभाळणारे डॉक्टरच राहत नाही. यामुळे रुग्णांची जबाबदारी परिचारिकांवर येत आहे. अशा बिकट अवस्थेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची सुपर रुग्णसेवा सापडली आहे.
धक्कादायक म्हणजे, आठवड्यापूर्वी साप चावलेल्या एक ३५ वर्षीय महिलेला सुपरमध्ये हिमोडायलिसीस करायचे होते. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरच नसल्याने त्या महिलेवर वेळेवर हिमोडायलिसीस होऊच शकले नाही.
परिणामी त्या महिलेचा मृत्यू झाला. यापूर्वी अशा घटना झाल्याचे सांगण्यात येते.
२०१२ पासून मंजुरीच नाही
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २०१२ मध्ये डी.एम.कार्डिओलॉजी व डी.एम.गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी हे अभ्यासक्रम नव्याने सुरू झाले. तसेच विविध विषयांमध्ये डी.एम. व एम.सीएच हे अभ्यासक्रम सुरू करावयाचे असल्याने कनिष्ठ निवासी डॉक्टरांची ३९ तर वरिष्ठ निवासी डॉक्टरांची ४७ असे एकूण ८६ पदांचा प्रस्ताव २०१२ मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला पाठविण्यात आला. परंतु या विभागाच्या उदासीनतेमुळे अद्यापही या पदांना मंजुरी मिळालेली नाही.