वेब सिरीजने वाढविले ‘ड्राय आय सिंड्रोम’चे रुग्ण; स्मार्टफोन व संगणकाचा अतिवापर घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 07:00 AM2021-10-20T07:00:00+5:302021-10-20T07:00:06+5:30

Nagpur News अलीकडे वेब सिरीज पाहण्याचे वाढलेले प्रमाण, मोबाइल गेम व संगणकाच्या अतिवापरामुळे डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘ड्राय आय सिंड्रोम’ म्हटले जाते.

Patients with ‘Dry Eye Syndrome’ enhanced by web series; Dangerous overuse of smartphones and computers | वेब सिरीजने वाढविले ‘ड्राय आय सिंड्रोम’चे रुग्ण; स्मार्टफोन व संगणकाचा अतिवापर घातक

वेब सिरीजने वाढविले ‘ड्राय आय सिंड्रोम’चे रुग्ण; स्मार्टफोन व संगणकाचा अतिवापर घातक

Next
ठळक मुद्देयुवकांसोबच लहान मुलांमध्ये वाढला २५ टक्क्यांनी आजार

सुमेध वाघमारे

नागपूर : अश्रू म्हणजे आपल्या भावनांचे प्रतीक! कधी दुखावलो गेलो की डोळ्यात चटकन अश्रू बाहेर पडतात तर कधी अत्यानंद झाला की, आनंदाश्रू येतात; पण जर तुमच्या डोळ्यांतून अश्रू येत नसतील तर तो एक आजार आहे. अलीकडे वेब सिरीज पाहण्याचे वाढलेले प्रमाण, मोबाइल गेम व संगणकाच्या अतिवापरामुळे डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘ड्राय आय सिंड्रोम’ म्हटले जाते. या आजाराचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांवर गेल्याचे नेत्ररोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Patients with ‘Dry Eye Syndrome’ enhanced by web series; Dangerous overuse of smartphones and computers

)

वयोमानानुसार दृष्टी कमकुवत होते म्हणून वृद्धांमध्ये आणि रजोनिवृत्तीमुळे स्त्रियांमध्ये ‘ड्राय आय सिंड्रोम’ची समस्या सामान्य आहे. दोन वर्षांपूर्वी मेयो, मेडिकलसह खासगी हॉस्पिटलच्या नेत्र रोग विभागात या आजाराच्या रुग्णांची संख्या जवळपास १५ ते २० टक्के होती. कोरोना काळातील निर्बंधामुळे आलेले ‘वर्क फ्रॉम होम’, तरुणांचे व मुलांचे ‘ऑनलाइन क्लासेस’ यामुळे या आजारात वाढ झाली आहे. तरुणांसोबतच लहान मुलांचे प्रमाण वाढले आहे. पापण्या लवू न देता सतत संगणक किंवा स्मार्टफोन स्क्रीनकडे एकटक पाहत राहणे हे, डोळे कोरडे होण्याच्या समस्येचे मुख्य कारण आहे. या क्रियेत पापण्या लवणेच होत नाही. संगणकाचा वापर करताना मिनिटाला १० ते १५ वेळा पापण्या मिचकावणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-शहरातील कोरडे हवामानही कारणीभूत

नेत्र रोगतज्ज्ञ डॉ. अजय अंबाडे यांनी सांगितले, शासकीय असो की खासगी नोकरी आता प्रत्येकाला संगणकावर डोळे लावून बसावेच लागते. यामुळे डोळ्यांच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. डोळे कोरडे होण्याच्या काही कारणांमध्ये अंधाऱ्या खोलीत स्मार्टफोन, संगणकाचा अतिवापर, व्हिटॅमिन एची कमतरता, एसीचा अतिवापर, अनियंत्रित मधुमेह, तंबाखूचे व्यसन, स्टेरॉइड ड्रॉपचा अतिवापर, ॲण्टिस्टॅमिना किंवा ॲण्टिडिप्रेसंट गोळ्यांचा वापर या गोष्टी कारणीभूत ठरतात.

-डोळे कोरडे होण्याची लक्षणे

डोळ्यांत जळजळणे किंवा खाज येणे, कधीकधी अंधुक दिसणे, डोळ्यांतून पाणी येणे, संगणकाच्या स्क्रीनकडे पाहताना त्रास होणे आदी डोळे कोरडे होण्याची लक्षणे आहेत. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये कोरड्या डोळ्यांच्या पृष्ठभागावर उघड्या नसांवर सूक्ष्म कण निर्मिती होऊन डोळ्यांत एकदम खुपल्यासारख्या वेदना होऊ शकतात. बाहेरून फिरून आले की, डोळे लाल होणे आणि नंतर आपोआप बरे होणे हा या आजाराचा सौम्य प्रकार आहे. ‘ड्राय आय सिंड्रोम’ची ही अगदी सुरुवातीची स्टेज, जी अनेकांमध्ये दिसते, असेही डॉ. अंबाडे म्हणाले.

पोस्ट कोविडच्या रुग्णांमध्ये ‘ड्राय आय सिंड्रोम’चे प्रमाण अधिक

बदलती जीवनशैली आणि तंत्रज्ञानामुळे डोळे कोरडे होण्याचा आजार वाढला आहे. संगणकाच्या अतिवापराचा परिणाम अश्रूग्रंथीवर होतो. अश्रू तयार करण्याचे कार्य कमी होते. डोळ्यातील ओलावा कमी होतो. यामुळे डोळ्यांचे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. अलीकडे संगणक व स्मार्टफोनचा अतिवापर होत असल्याने ‘ड्राय आय सिंड्रोम’चे प्रमाण वाढले आहे. विशेषत: पोस्ट कोविडच्या रुग्णांमध्ये हा आजार अधिक दिसून येत आहे. यामुळे लक्षणे दिसताच नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

-डॉ. अजय अंबाडे, नेत्ररोगतज्ज्ञ

Web Title: Patients with ‘Dry Eye Syndrome’ enhanced by web series; Dangerous overuse of smartphones and computers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.