गृहविलगीकरणातील रुग्ण वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:10 AM2021-05-05T04:10:39+5:302021-05-05T04:10:39+5:30
सर्वे करून गंभीर रुग्णावर उपचाराची गरज लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णालयात ...
सर्वे करून गंभीर रुग्णावर उपचाराची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने हजारो गंभीर रुग्ण घरीच उपचार करीत आहेत. अशा रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन व औषधी उपलब्ध होत नाही. गृहविलगीकरणातील रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु सध्या या रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. अशा रुग्णांचाही मृतात मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये गृहविलगीकरणातील रुग्णांची नोंद ठेवून यातील किती रुग्ण गंभीर आहेत. यापैकी किती जणांना रेमडेसिविर व ऑक्सिजनची गरज आहे. किती रुग्णांना एचआरसीटी चाचणी करण्याची गरज आहे. याची माहिती झोन कार्यालयाकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे. परंतु अशी माहिती या कार्यालयाकडे उपलब्ध नाही.
बेड न मिळाल्याने हजारो रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. परंतु त्यांना वेळीच उपचार मिळत नाही. रेमडेसिविर व ऑक्सिजनची व्यवस्था होत नाही. गंभीर रुग्णांना रुग्णालयातही दाखल करून घेतले जात नाही. यामुळे मृतांची संख्या वाढत आहे.
...
मनपाने काय करावे
गृहविलगीकरणातील रुग्णांचा सर्वे करावा.
आरोग्य विभागातर्फे औषध उपलब्ध करावे.
ऑक्सिजन लेव्हल कमी व सिटी स्कॅन कमी असलेल्यांना उपचाराची व्यवस्था करावी.
गरज भासल्यास रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत कावी.
गंभीर रुग्णांची नोंद करून ऑक्सिजन व रेमडेसिविरची व्यवस्था करावी.
...
विभागीय आयुक्तांकडे सर्वेची मागणी
गृहविलगीकरणातील रुग्णांना मनपाने वाऱ्यावर सोडले आहे. अशा रुग्णांचा सर्वे करून गंभीर रुग्ण,किती जणांना रेमडेसिविर व ऑक्सिजनची गरज आहे. किती रुग्णांना एचआरसीटी चाचणी करण्याची गरज आहे. याची माहिती संकलित करून गंभीर रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध करण्याची मनपाने व्यवस्था करावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे.