आमदार निवास कोविड केअर सेंटरमधील रुग्ण अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 10:31 PM2020-07-07T22:31:27+5:302020-07-07T22:32:41+5:30
आमदार निवासातील कोविड सेंटर सुरू होऊन एक दिवसाचा कालावधी होत नाही तोच दुसऱ्या दिवशी विविध समस्यांना येथील रुग्णांना तोंड देण्याची वेळ आली. मंगळवारी सकाळपासून पिण्याचे पाणी नव्हते, एम्सच्या रुग्णांना दुपारचे जेवण मिळाले नाही. सायंकाळी पाणी एका टँकमध्ये आल्याने रुग्णांना आपले कक्ष सोडून खाली यावे लागल्याची रुग्णाची तक्रार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमदार निवासातील कोविड सेंटर सुरू होऊन एक दिवसाचा कालावधी होत नाही तोच दुसऱ्या दिवशी विविध समस्यांना येथील रुग्णांना तोंड देण्याची वेळ आली. मंगळवारी सकाळपासून पिण्याचे पाणी नव्हते, एम्सच्या रुग्णांना दुपारचे जेवण मिळाले नाही. सायंकाळी पाणी एका टँकमध्ये आल्याने रुग्णांना आपले कक्ष सोडून खाली यावे लागल्याची रुग्णाची तक्रार आहे.
सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये ठेवण्याचे ‘आयसीएमआर’च्या सूचना आहेत. त्यानुसार आमदार निवासातील संस्थात्मक विलगीकरण कक्ष बंद करून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. रविवारी रात्रीपासून हे सेंटर रुग्णसेवेत सुरू झाले. सध्या या सेंटरमध्ये ८५ रुग्ण उपचाराला आहेत. येथील एका रुग्णाने ‘लोकमत’ला फोन करून सांगितले की, आज सकाळपासून पिण्याचे पाणी मिळाले नाही. येथील डॉक्टरांनी फोन करून माहिती दिल्यानंतर सायंकाळी एका वाहनातून टाकीभरून पाणी आले. हे पाणी खोलीपर्यंत पोहचविण्यात न आल्याने रुग्णांना चौथ्या माळ्यावरून खाली येत पाणी घेऊन वर चढावे लागले. अनेकांकडे पाणी साठवण्याची सोय नव्हती, ते अडचणीत आले. दुपारच्या सुमारास एम्समधून १९ रुग्ण दाखल झाले. या रुग्णांना जेवण मिळाले नाही. याचीही तक्रार येथील संबंधित डॉक्टरांकडे करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
या संदर्भात तहसीलदार राहुल सारंग यांना विचारले असता, ते म्हणाले, अचानक रुग्ण वाढल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली. परंतु ती तातडीने सोडविण्यातही आली. ज्यांच्याकडे पाणी घेऊन जाण्यची सोय नव्हती त्यांना जार उपलब्ध करून देण्यात आले. दुपारी जेवण झाल्यानंतर एम्समधून रुग्ण आले. यामुळे जेवणाची सोय होऊ शकली नाही, असेही ते म्हणाले.